पान:विश्व वनवासींचे.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
क्रांतिवीर राघोजी भांगरे : प्रस्तावना

 संपूर्ण मायाजाल (Inter net) शोधले. परंतु वनवासी क्रांतिकारक 'राघोजी भांगरे' यांच्याबद्दल एक जुजबी परिच्छेदाच्यावर मजकूर आढळला नाही. त्यात कोळी समाजातला 'डाकू' असाही उल्लेख आहे आणि फक्त १८४५ ते १८४७ या कालखंडातील घटनांचा तपशील गॅझेटमध्ये आहे. त्यात २ मे १८४८ला या महान क्रांतिकाराला हौतात्म्य पत्कारावे लागले अशी नोंद केलेली आहे.

 वनवासी क्रांतिकारकांच्या कार्याचे मोल जाणून डॉ. गोविंद गारे आणि डॉ. प्रभाकर मांडे यांनी अलिकडे लेखन केलेले आहे. त्याचप्रमाणे डॉ.सौ.सरल धारणकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्य समर आणि वीर भागोजी नाईक या पुस्तकात 'आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे' यांचा संशोधनात्मक दृष्टीने परामर्श घेतला आहे. अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, नाशिक जिल्ह्याने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध क्रांतिकारकांची मोठी उद्बोधक माहिती दिलेली आहे.

 या पार्श्वभूमीवर आमचे स्नेही श्री. भाऊसाहेब नेहेरे यांनी परिश्रमपूर्वक संशोधन करून लिहिलेल्या 'सह्याद्रीचा वाघ' अर्थात् राघोजी भांगरे या पुस्तकाला पुरस्कार लिहिताना अतिशय आनंद होत आहेत. त्यांनी सर्व स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन संबंधितांकडून सर्व राघोजी भांगरे विषयक माहिती घेतली. राघोजी यांच्या संपर्कातील गोष्टींची सर्व प्रकाश चित्रेही या पुस्तकात दिली आहेत. यावरून त्यांनी या छोटेखानी ऐतिहासिक दस्तवेजाचीच जणू एक निर्मिती केली आहे. अतोनात कष्ट घेऊन पुराव्यानिशी या क्रांतिकारकाला प्रकाशात आणले आहे.

 श्री. भाऊसाहेब नेहरे यांनी केलेले हे कार्य निश्चितच गौरवास्पद आणि इतिहासाच्या अभ्यासकांना प्रेरणा देणारे ठरेल. या प्रकाशनाबद्दल त्यांना अंत:करणपूर्वक धन्यवाद द्यावेसे वाटतात. स्वतः भाऊसाहेब हे इतिहासाची आवड असलेले द्वि पदवीधर असून जनजाती समाजातील

११४
विश्व वनवासींचे