पान:विश्व वनवासींचे.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपले सगळे आयुष्यच झोकून देऊन, अंत:प्रेरणेने, दृढनिश्चयाने आणि आपला हेतू स्वच्छ ठेवून हे कार्यकर्ते स्वकार्यमग्न असतात. खरे भारतीयत्व वनवासींनीच जपले हे त्यांच्या रूढ जीवनपद्धतीवरून, आचार-विचार विहारावरून लक्षात येते. पण वनवासींच्या अज्ञानाचा, गरिबीचा आणि अडाणीपणाचा लाभ घेऊन देशद्रोही चळवळी आणि कारवाया त्यांच्यात आणखी न्यूनगंड निर्माण करतात. ख्रिश्चन धर्मप्रसारकांकडून त्यांची फसवणूक चालू आहे. यातून सुटका करण्याची, सोडवणूक करण्याची प्रेरणा देणारी ही 'जांभूळपाडा' कादंबरी आहे.

 हा वनवासी बांधव हिंदूच आहे, हे महात्मा गांधी यांनी 'यंग इंडिया' मधील लेखात मांडले आहे. त्यांच्या या मताचा आदर आणि स्वीकार आपण केला पाहिजे. वनवासींमध्ये रूढ असलेली पारंपारिक हिंदू जीवनपद्धती, उलट आपण ती अनुकरणीय आहे म्हणून टिकविली पाहिजे.

 आपण सगळे शेवटी एकाच स्तरावरील आहोत. त्यातून आपण बंधुभाव टिकवावा. उत्तम भाग्यासाठी, उन्नतीसाठी आपले सर्वांचेच प्रयत्न असावेत म्हणजे प्रगतीचा परमवैभवाप्रत जाण्याचा मार्ग खुला होईल, असा बोध वाचकांना करून देणारी प्रेरणादायी अशी ही 'जांभूळपाडा' कादंबरी नव्या पेहरावात वनयात्री प्रकाशन सादर करीत आहे. चोखंदळ रसिकवाचक या कादंबरीच्या नव्या दुसऱ्या आवृत्तीचे मोठ्या आनंदात स्वागत करतील आणि भरघोस प्रतिसाद देतील, असा वनयात्री प्रकाशन समितीला विश्वास वाटतो.

***


जांभूळपाडा : प्रस्तावना

११३