पान:विश्व वनवासींचे.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखन या चिंतनातूनच झाले.

वनवासी क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक

 वनवासी क्षेत्रातील युवकांना रोजगार मिळावा, ते स्वावलंबी व्हावेत म्हणून त्यांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. योग्य त्या ठिकाणाहून प्रशिक्षण घेऊन आल्यावर ते स्वत:च्या पायावर उभे होतील. जो कच्चा माल व्यवसायासाठी, ज्या भागात तो उपलब्ध आहे, त्यावर आधारित प्रशिक्षण जास्त फायद्याचे ठरते. उदा. बांबूची बने जिथे दाट असतील तेथील तरुणांना 'आगरताळा' येथे नेऊन प्रशिक्षण देणे फलदायी ठरणारे आहे. कोकम, टोमॅटो यांचे उत्पादन जास्त तेथे कोकम सरबत आणि टोमॅटो केचपचे प्रकल्प उभे करता येतील. पाऊस ज्या भागात भरपूर पडतो, पण जर ते पाणी नुसतेच खळाळून वाहून जात असेल तर तेथे श्रमदानाने विहिरी बांधल्या पाहिजेत. नदीचा गाळ काढून खोली वाढविली पाहिजे. पाणी अडवणारे बंधारे, शेततळे, जमिनीचे सपाटीकरण, संरक्षक भिंती, पाझर तलाव, पाणी अडवा-पाणी जिरवा अशा पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेतली पाहिजेत. अशा मूलभूत विकासकामांची महती अतिग्रामीण भागात वावरलेल्या या लेखकाला तीव्र जाणवली. तेवढ्यासाठी त्याने वनवासी क्षेत्र पिंजून काढले. तेथील जीवन समजून घेतले. कम्युनिस्ट, साम्यवादी, ख्रिश्चन धर्मप्रचारक यांचे विधायक कामातही येणारे अडथळे अनुभवले. वनवासी क्षेत्रातील त्यांचे उपद्रव सतत वाढतच होते. 'डॉ. सुधीर शास्त्री'सारख्या नायकाच्या, अन्य पात्रांच्या निर्मितीतून त्यांनी या प्रतिकूल स्थितीवर तोडगे शोधण्याचा प्रयत्न केला. पात्रे काल्पनिक असली तरी रचनात्मक कार्याचा संदेश 'जांभूळपाडा' मध्ये आहे. आधुनिक पद्धतीने शेतीव्यवसाय करणे, संस्कार केंद्रे, बालवाड्या, बचतगट, रोजगारनिर्मिती, स्त्रीशक्ती, प्रबोधन, आरोग्यसेवा, प्रशासन, साक्षरता या गोष्टींमधूनच खेडेपाडे घडतील. त्यांची विकासाकडे वाटचाल होईल.

वनवासींचे भारतीयत्व

 शासनाने स्वयंसेवी संस्थांमधील जीवनव्रती सेवाभावी कार्यकर्त्यांकडून कामाची दिशा आणि स्वरूप समजावून घ्यावे. कारण

११२
विश्व वनवासींचे