पान:विश्व वनवासींचे.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जांभूळपाडा - प्रस्तावना

 वनवासी कल्याण आश्रमाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या भारतभरच्या अनेक वसतिगृहांपैकी 'गुही' वसतिगृह नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील जुने आणि वनवासी विद्यार्थी संख्या-बहुल असे आहे.

 या वसतिगृहाची गरज, त्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी, त्यावेळचे वातावरण याचे अत्यंत बारकाईने अवलोकन करून लिहिलेली 'जांभूळपाडा' ही कादंबरी आहे. एका ध्येयवादी, निष्ठावंत माणसाच्या कार्याचा परामर्श घेणारी ही कथा आहे. उद्योजक रमेश पटवर्धन यांनी एका तपापूर्वी, म्हणजे १९९८ साली, वनवासी क्षेत्रातील सामाजिक कार्याला उजाळा देण्यासाठी 'जांभूळपाडा' ही कादंबरी लिहिली होती. तिला 'लघुकादंबरी' असे संबोधले गेले, तरी ती आशयघन आहे. मोठा आवाका असलेली स्वत:च्या खास शैलीत लिहिलेली ती बहुगुणी कादंबरी आहे. म्हणूनच वनयात्री प्रकाशन समितीने नवी दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याचे ठरविले. आजकाल प्रकाशनात येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून हे काम हाती घेतले आहे. भावी काळातही 'वनयात्री प्रकाशन' अशी दुर्मिळ वनवासीविषयक ग्रंथसंपदा, होणारे संशोधन आणि सर्जनशील ललित प्रकाशित करणार आहे. त्यामधील उचललेले हे एक पाऊल आहे.

मराठी साहित्यातील जोरकस प्रवाह

 मराठी सहित्यात विविध प्रवाह रूढ आहेत. त्यात ग्रामीण, दलित व वनवासी प्रवाह समाविष्ट होतात. अलीकडील १९८० नंतरच्या मराठी साहित्यात 'वनवासी साहित्याचा प्रवाह' हा एक जोरकस प्रवाह मानला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने ललित साहित्य, कविता, कथा, कादंबरीप्रमाणेच वैचारिक साहित्यही मोठ्या प्रमाणात लिहिले जात असल्याचे दिसून येते. वनवासी साहित्यिकांची प्रतिवर्षी विविध साहित्यसंस्था सम्मेलनेही भरवीत आहेत. त्यासाठी लेखनविकास

११०
विश्व वनवासींचे