पान:विश्व वनवासींचे.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कादंबरी वाचून पटते.

 'रिंगण' या कादंबरीत ‘देवू', 'सोनू' ही पात्रे महत्त्वाची आहेत. देवू हा ‘काज'च्या अमानूष प्रथा बंद करण्यासाठी निघालेला सुशिक्षित तरुण आहे. जव्हारसारख्या वनवासी भागातील हे कथानक आहे. त्यामुळे या कादंबरीत जव्हार परिसर जिवंत झाला आहे. त्याचे वास्तव चित्रण कादंबरीत केले आहे. देवूचा एक सुशिक्षित तरुण म्हणून समाजसुधारणेचा प्रयत्न आहे. शिक्षणाने हे परिवर्तन त्याच्या मनात जागवलेले आहे. देवूला आश्रमशाळेतील वातावरणाचा अनुभव शिक्षण घेता घेता आलेला आहे. त्याच्यावर आचार्य भिसे यांच्या वनवासी सेवेचे आणि वनवासी हिताच्या विचारांचा पगडा आहे. म्हणूनच तो अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो. यातील 'काज'चे गाव धारणगाव असून न्याहाळेपाड्याचे वातावरण जिवंत करण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. पाड्यावरील इत्थंभूत माहिती लेखकाने यशस्वीपणे चित्रित केली आहे.

 देवूचा शेतमजुरी करणारा बाप रामा हा सालदार म्हणून मालदाराकडे राहतो. तेच त्याच्या चरितार्थाचे एकमेव साधन होते. रामाचा मुलगा सोनू हा नुसता नावाचा सोनू होता. रामाचे सगळे आयुष्य अडाणीपणात पोटाची टीचभर खळगी भरण्यात गेलेले आहे.

 ओघामध्ये भयंकर वेठबिगारी प्रथेचे चित्रण या कादंबरीत आलेले आहे. यमनीच्या लग्नासाठी कुशाबाला दोन हजार रुपये कर्ज घ्यावे लागते आणि त्याच्या पायी (बदल्यात) स्वत:ची जमीन गमवावी लागते.

 विशेषत: 'क'ठाकूर आणि वारली या जातींमध्ये ही 'काज' प्रथा आहे. 'गाज' वरून 'काज' शब्द आलेला असावा, असा अंदाज लेखकाने केला आहे. पौष महिन्यात हा तीन दिवसांचा ‘काज' सोयीनुसार केव्हाही केला जातो. हे वर्षश्राद्ध गरिबीमुळे दोन-चार वर्षांतून एकदा केले जाते. स्त्री-पुरुषाची विलापिकासदृश शोकगीते मृताच्या नावे गाण्याची पद्धत 'काज'मध्ये आहे. वीराला 'भावया'

१०८
विश्व वनवासींचे