पान:विश्व वनवासींचे.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व त्या वीराच्या अंगात संचार झाल्यावर 'आहेर' स्वरूपात त्याला दिले जातात. त्यानंतर हे वीर स्वत:च्या डोक्यावर धारदार कट्यारीने वार करतात. त्याचे रक्त पायाच्या अंगठ्यावर सांडावे एवढा तो क्रूर वर्मी घाव असतो. हे रक्तांनी न्हालेले वीर शांत झाल्यावर विधी पार पडल्यावर, वनस्पती औषधाने तात्काळ आपली जखम पूर्ण बरी करून घेतात.

 या ‘काज' विधीकडे अंधश्रद्धेने पाहिले जाते; परंतु गरिबाला परवडेल अशी ही समाजव्यवस्था आहे. जेथे तांदळाचा पिंड परवडत नाही, तेथे मातीचा पिंड करून 'काज' करतात. हा विधी सगळे मिळून, एकत्रित, सामुदायिक असल्यामुळे खर्च व्यक्तिगत वाट्याला जवळजवळ येतच नाही आणि यातील सगळ्यात जमेची बाजू म्हणजे एखाद्या स्त्रीचा पती मृत पावल्यास विधवा स्त्रीला तेथे उपस्थित विधुराशी विवाह करता येतो किंवा एखाद्या पुरुषाची पत्नी वारल्यावर त्यालासुद्धा जिचा पती मेला आहे, अशा स्त्रीशी, त्या विधवेशी तो विवाह करू शकतो. तेही केवळ पदरात रुपया बांधून तात्काळ विवाह ठरविले जातात. याचा अर्थ हे एका गरीब कुटुंबाचे पुनर्वसन आहे. त्या स्त्रीला, विधवांना संरक्षण व भावनिक आधार मिळतो. शिवाय स्त्रीच्या पहिल्या पतीकडून झालेल्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मिटते. हेच पुरुषाच्या बाबतीत आहे. ज्यांच्या पत्नीचे निधन झालेले आहे, त्याच्या घरची, घरदार सांभाळण्याची किंवा संसाराची सर्व जबाबदारी ती स्त्री घेते. हे कुटुंबाचे पुनर्वसन अनिवार्य आहे. अत्यल्प श्रमात कोणताही प्रचार, प्रसार, दळणवळण साधने हाती नसताना अशी ही 'काज' प्रथा म्हणजे सामुदायिक श्राद्धाची प्रथा अद्यापही वनवासी समाजात चालू आहे. या प्रथेचा धागा पकडून सन्मित्र श्री. उल्हास रहाणे यांनी 'रिंगण' या कादंबरीचे कथानक लिहिले आहे. कादंबरी म्हटली की, त्यात कल्पित व वास्तव यांचे आगळे रसायन आपोआपच तयार झालेले असते. त्या दृष्टीने एका आगळ्या-वेगळ्या विषयावरील ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी वाचकांना निश्चितच आवडेल, याची खात्री ही

रिंगण : प्रस्तावना

१०७