पान:विश्व वनवासींचे.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'रिंगण' : प्रस्तावना

शुभास्तु ।

 श्री. उल्हास रहाणे यांची 'रिंगण' ही कादंबरी प्रस्तावनेसाठी माझ्याकडे आली, ही सुखदायी गोष्ट आहे. कारण जव्हार येथील नऊ वर्षांच्या वास्तव्यात खरोखर प्रत्यक्षात वनवासी समाजाशी माझा अत्यंत जवळून जिव्हाळ्याचा संबंध आला.

 या कादंबरीच्या प्रस्तावनेनिमित्त एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, लोककला क्षेत्रातील जाणकार श्री. अशोक जी. परांजपे यांच्यासमवेत मला वनवासी पाड्यातील मुक्कामात 'वनवासी काज' हा विधी प्रत्यक्ष मुक्काम ठोकून अनुभवायला मिळाला. त्यावेळी खरोखर एका वेगळ्या दृष्टीचे, उदात्त व उदार संस्कृतीचे दर्शन घडले. वनवासींच्या ‘काज' या विधीशी संलग्न अशी उल्हास रहाणे यांची 'रिंगण' कादंबरी आहे.

 वनवासी ‘काज' म्हणजे एका अर्थाने सामुदायिक विवाहासारखाच सामुदायिक श्राद्धाचा विधी आहे. त्यामध्ये परिसरातील खेड्या-पाड्यावरील एखादा श्रीमंत पाटील हा मध्यरात्री ‘डाका/ढोल'सारखे वाद्य वाजवून आपण 'काज' घालणार असल्याचे जाहीर करतो. या ‘काजा'साठी काही पोती तांदूळ आणि काही व्यवस्था करावी लागते. एवढ्यावर त्या गावामध्ये ‘काज' होणार असल्याचे जाहीर होते. साधारणपणे वर्षभरात ज्याच्या घरी कोणाचा मृत्यू झाला असेल अथवा कोणी जवळचे नातेवाईक वारले असल्यास अशा लोकांनी त्या मृतांच्या आठवणींना एकत्रित येऊन उजाळा देण्याचा, शोक करण्याचा हा विधी आहे. त्यामध्ये वीर नाचतात, त्यांच्या अंगात येते आणि आपल्या मृत व्यक्तीचा संचार त्यांच्यामध्ये होतो, अशी भावना आहे. आपल्या नातेवाईक मृत व्यक्तीला आवडणाऱ्या सर्व वस्तू, आवडीचे पदार्थ हे

१०६
विश्व वनवासींचे