पान:विश्व वनवासींचे.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली. आवारी गुरुजी व माझे काही शब्द असा मिळून हा 'वनवासी कोकणा शब्दकोश' आम्ही सिद्ध केला आहे. तो वनवासी कल्याण आश्रम प्रकाशित करीत आहे.

या शब्दकोशाची उपयुक्तता

 वनवासी शब्दकोशाची ही केवळ नांदी आहे. वनवासी शब्दांचा स्वतंत्र असा छोटेखानी स्वरूपात का होईना पण हा पहिलाच प्रयत्न म्हणावा लागेल. मात्र याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यातील २० टक्के शब्द मराठीतून आलेले असे आहेत. वनवासी क्षेत्रात आज प्रमाण मराठी बोलणारे अनेक जण कार्य करतात. त्यांना तर याचा उपयोग होईलच, पण वनवासी कला, साहित्य आणि संस्कृती जाणकारांना, जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांना याची खचितच मदत होणार आहे. यातून पुढे भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासाला प्रेरणा मिळेल. उदा. वनवासी म्हणी, वाक्प्रचारांचा कोश, आहाणे, उखाणे-प्रहेलिका, व्याकरण असे स्वतंत्र कोश तयार करणे शक्य होईल. लोकभ्रम, संकेतकोशही करता येईल. एवढी प्रेरणा यातून मिळाली तरी या प्रकाशनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

 आपण साधे ठाणे जिल्ह्याचे उदाहरण घेतले तरी तेथे वारली, कोकणा, महादेव कोळी, क-म-ठाकूर, मल्हार कोळी, दुबळा, धोडी, कातकरी, ढोर कोळी, पारधी, फासेपारधी, कुणबी अशा बारा प्रकारच्या जाती आढळतात. मग त्यांच्या बोलीभाषेतही फरक पडतोच. त्यांचे शब्दसंग्रहसुद्धा काहीसे विभिन्न मराठी असून होतातच. याचा सविस्तर खोलात शिरून गंभीरपणे अभ्यास करणे यापुढे शक्य होईल.

 भाषा आणि भाषक यांच्यात नाते निर्माण होते ते अशा शब्दकोशांमुळे. मातृभाषेसाठीही प्रसंगी कोश पाहावयाचा असतो ही कल्पनाही आपल्या गावी नसते. परभाषेसाठी मात्र शब्दकोश शब्दांच्या उच्चारासह पाहणे आपल्याला अनिवार्य वाटते. वस्तुत: आपण आपली मराठी शब्दकळा परमार्थाने समजून घेतली पाहिजे. त्यादृष्टीने वनवासींच्या मराठी बोलीभाषेतील रूढ शब्दांचा हा कोश विशेष पथदर्शक होईल. परस्परांना समजून घेण्यासाठी, सांस्कृतिक अभिसरणासाठी तो उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.

 (वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र प्रांत १५, कृषिनगर, नाशिक ४२२००५ येथे हा कोश उपलब्ध होईल).

***'
वनवासी कोकणा शब्दकोश : प्रस्तावना

१०५