पान:विश्व वनवासींचे.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाडल्यावरही चालूच होते. त्यांचा दांडगा उत्साह तरुणांनाही दीपवणारा होता. त्यांचे अनेक संकल्प वनवासी संस्कृतीचे गूढ उलगडून दाखवणारे होते. सांस्कृतिकदृष्ट्या वनवासी बंधू हा हिंदू संस्कृतीतच वाढलेला आहे आणि त्याची खरी नाळ हिंदू संस्कृतीशीच जोडलेली आहे या मताशी ते अखेरपर्यंत ठाम होते. त्यादृष्टीने त्यांचे शोधसंकल्प होते पण आता ते सारे अपुरे आणि अर्धवटच राहिले आहेत.

गुरुजींचे वाङ्‍‍मय प्रकाशन हेच पुण्यस्मरण

 दि. ८ जुलै २००४ला गुरुजींचे वर्षश्राद्ध आहे. त्यांचे श्राद्ध खऱ्या श्रद्धेने वनवासी कल्याण आश्रमाने भक्तिभावाने करण्याचे ठरविले आहे. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या तीन कार्यकर्ता संमेलनाला, वयोवृद्ध गुरुजींना कानपूर, रायपूर, आणि वाराणसी एवढ्या लांबच्या प्रवासात मला सोबत करता आली. त्यांचे मार्गदर्शन, वाचन, व्यासंग याची प्रचीती या सहवासात आली. त्यांचा विश्वास संपादन करता आला. केवळ त्यामुळेच त्यांनी त्यांच्या वनवासी शब्दकोशाची वही मला भाषिकदृष्ट्या व प्रकाशनयोग्य मुद्रण प्रत करण्यासाठी दिली होती. मी ती संपादून पुन्हा त्यांना सुधारणा सुचविल्या होत्या. त्यांनी ते अकारविल्हे क्रम लावणे आणि त्याचे योग्य ते करा म्हणून ते हस्तलिखित पुन्हा माझ्याकडे सोपविले. माझ्या कामात त्यांची नोंदवही तशीच प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेली राहिली. सावकाश गुरुजींच्या जवळ बसूनच अंतिम फेरफार करू अशा विचारात असतानाच आवारी गुरुजी गेल्याची दु:खद वार्ता हृदयाला स्पर्शेन गेली. काम अपुरे राहिल्याचे काळजात सलत होतेच. मग सुदैवाने महाराष्ट्र प्रांत वनवासी कल्याण आश्रमाची प्रांत कार्यकारिणी आणि कार्यवाह प्रमोदराव कुलकर्णी यांना व्यथा सांगितली. त्यांनी शब्दकोष पुस्तक रूपात सिद्ध करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. प्रकाशनाचा बोजा मात्र वनवासी कल्याण आश्रमानेच पेलला आहे.

प्रल्हाद कुलकर्णी यांची साथ

 श्री. प्रल्हाद कुलकर्णी यांची मोलाची साथ मी घेतली. कारण ते शुद्धलेखन, संगणक अक्षरजुळणी आणि ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकार मित्र होते. त्यांनी ते काम कर्तव्य व एक पुण्यकर्म म्हणून स्वीकारले. मलाही आठवले, जव्हारमधील वास्तव्यात माझ्याकडेही सुमारे एक हजार शब्दांचा संग्रह होता. तोही त्यात समाविष्ट करण्याचे ठरविले. त्याची जुळणी अर्थ पडताळून

१०४
विश्व वनवासींचे