पान:विश्व वनवासींचे.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवासी कोकणा शब्दकोश : प्रस्तावना

 वनवासी कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष कै. गंगाराम जानू आवारी उपाख्य आवारी गुरुजी यांची मुळात ही शब्दकोशाची संकल्पना होती. त्यांचा या क्षेत्रातला अधिकार आणि परिचय फार पूर्वीपासूनच सर्वश्रुत होता. पेठ भागात कोणी एक गुरुजी फार अभ्यासू आहेत. त्यांनी अनंत गोष्टींचा संग्रह आणि जमवाजमव केलेली आहे. त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ते वनौषधी तज्ज्ञ असल्याने आयुर्वेदाचे आणि इतर डॉक्टरही जातात. त्यांना भेटतात.

 अनेकांनी त्यांच्या या संग्रही आणि अभ्यासू वृत्ती आणि बुद्धीची लोकविलक्षण चमक ते फारसे शिकलेले नसूनही अनुभवलेली आहे. आयुर्वेदतज्ज्ञ, निसर्गप्रेमी मंडळी जशी त्यांच्याकडे जात तसे साहित्य आणि भाषेचे अभ्यासक, संशोधकही त्यांची भेट घेऊन चर्चा करीत, मार्गदर्शन घेत असत.

सावध गुरुजी

 मात्र गुरुजी स्वतः सावध असायचे. आपल्या संकलनाचा, ज्ञानाचा कोणी स्वत:च्या नावावर आयता वापर करून मोठेपणा मिरवित नाही ना, ही त्यांची शंका असे. कारण त्यांनी आयुष्य वेचून कमावलेले त्यांचे ज्ञान आणि विचार-चिंतन अन्य भाषांत भाषांतरित करून तथाकथित सुशिक्षित मंडळी ते वापरीत तर नाही ना, अशी त्यांना चिंता वाटे. आपल्या अभ्यासाचे आधार आणि संदर्भ न सांगणारे त्यांच्या जाणिवेत होते म्हणून ते काळजी घेत. 'झेरॉक्स' सुविधा नव्हती तेव्हाही आपल्या सुंदर, स्वच्छ, रेखीव हस्ताक्षरात ते कष्ट सोसून स्थळप्रत किंवा हस्तलिखिताची प्रत ठेवीत असत. आपल्या नोंदवहीला ते फार जपत. समक्ष दाखवून लगेच परत घेत. फार तर इतरांना अलीकडच्या काळात झेरॉक्स पाने देत.

अपुरे संशोधन : अर्धवट संकल्प

 कै. गुरुजींना खूप काही संशोधन करायचे होते. विविध विषयांत त्यांना गम्य होते आणि गती होती. पक्ष्यांच्या पिसांची औषधे, फुलांचे विविध गंध, वेलींच्या जाती, कीटकांची गणती यांसारख्या निसर्ग, पर्यावरण, जैविक विविधतेच्या अंगाने आणि त्या संदर्भात त्यांचे संशोधन, अभ्यास अमृतमहोत्सवी वर्ष पार

१०३