पान:विश्व वनवासींचे.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महिला कार्यकर्त्यांनी एक कोटी रूपयांचा निधी या छात्रावासाला मिळवून देऊन वैभव प्राप्त करून दिले आहे. श्रीमती बुद्धिमाया या येथील व्यवस्थापिका आणि त्यांचा भाऊ तेथे वसतिगृह प्रमुख आहे. इयत्ता ३री ते ९वीतील विद्यार्थी व प्रामुख्याने २५ नेपाळी विद्यार्थी तेथे होते. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक १४ जानेवारी २०१४ रोजी येथे आयोजित करण्यात आली होती. सन २००२मध्ये स्थापन झालेले हे एक आदर्श वसतिगृह ठरले आहे. गंगटोक दर्शनात एनर्जी पार्क पाहिले. तसेच, फ्लॉवर व्हॅली पाहिली. नंतर जलपायगुडीपासून रेल्वेने आम्ही गुवाहाटी गाठले. तेथे श्री. मनोज भट, श्री. रमेशबाबू आणि श्री. मोहनलाल दास या ३ कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य देऊन आगत-स्वागत, निवासाची व स्थळदर्शन व्यवस्था केली.

 डाकिणी नावाचा डोंगर आणि त्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असे भीमाशंकर, महागणपती मंदिर दाखविले. 'डाकिण्याम् भीमाशंकरम्' असे म्हणलेले असल्याचे पटते. त्यानंतर कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तेथे संघप्रणित आसाम प्रांत वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्त्यांची बैठक झाली. आमचे प्रतिनिधी म्हणून सर्वत्र श्री पांडुरंग भांदककर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचा सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांचा विश्वास 'जब जागो तब सवेरा है। देर है मगर सही है।' या गीताद्वारे प्रकटला. हे सर्वच कार्यकर्ते २०-२५ वर्षांपासून तेथे कार्यरत आहेत. नंतर काझिरंगा अभयारण्यात हत्तीवरून गेंडे पाहिले. तसेच, मोसमाई गुंफा पाहिली. सेव्हन सिस्टर्स पॉइंट पाहिला. बडापानी कॉर्नर पाहिला. उदालगुडी येथील मुलींचे वसतिगृहात तेथे राहणाऱ्या १८ मुलींनी जे आदरातिथ्य दाखविले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. त्यांचा निरोप घेताना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले. ऊर भरून आले. सदैव हसतमुखाने व समर्पित भावनेने कष्ट करण्याचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. नंतर मुलांचे वसतिगृह पाहिले. येथे १४ मुले आहेत. नंतर तेजपूर (शोणितपूर) व चित्रलेखा गार्डन पाहिले. तेथे वीज नसताना जंगलात झोपडी बांधून २३ वर्षे एकटा राहणारा कार्यकर्ता आम्हांला भेटला. डोळे दीपवून टाकणारे सागरासारखे ब्रह्मपुत्रा नदीतील माजोली बेट पाहिले. तेथे विभाग कार्यवाह/प्रचारक योगेशजी भेटले. माजोलीमध्ये शंकर देव, माधव देव, कमलाबारी उत्तर व दक्षिण पाहिली आणि स्वामी विवेकानंद केंद्राची प्रशाला पाहिली. श्री. वासुदेवानंद उपाध्याय तेथे प्राचार्य

अभिनव पूर्वांचल वनयात्रा

१०१