पान:विश्व वनवासींचे.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिली आहे.

 महिलांसाठी स्वयंरोजगार व उत्पन्नाची साधने निर्माण करणे, मुलांसाठी बालवाडी चालविणे, प्रौढ शिक्षण, मुलांसाठी वसतिगृह, महिला-बालकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, देवदासी होण्यापासून तरुण मुलींना वाचविणे व समाजाच्या विविध कलांच्या जोपासनेसाठी व विकासासाठी जोरदार प्रयत्न केले. रोजगाराच्या दृष्टीने डेअरी प्रोजेक्ट, तर स्वच्छतेच्या दृष्टीने स्वच्छतागृह प्लॅण्ट त्यांनी ग्रामीण भागात उभारले आहेत. बेळगावातील यमुनापूर येथील उत्थान संस्था याची साक्ष देत राहील.

 त्यांच्या पुस्तकांचे कन्नड, हिंदी, इंग्रजीमध्ये अनुवाद झालेले आहेत आणि विविध विद्यापीठांच्या पदवीधर अभ्यासक्रमात ती पुस्तके नेमलेली आहेत. त्यांच्या ग्रंथांना एकूण १५ पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, कर्नाटक राज्य साहित्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य पुरस्कार, बा.सी. मर्डेकर महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार हे त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार आहेत. आपला समाज वाचीत नाही मग लेखन करून उपयोग नाही असे त्यांचे मत होते. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने त्यांना गोदागौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. सोलापूर येथे भरलेल्या सामाजिक समरसता साहित्य परिषदेच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रसिद्धी विन्मुख असूनही हे सर्व मान सन्मान त्यांच्याकडे चालत आले होते.

 भीमराव गस्ती यांचे दि. ८ ऑगस्ट २०१७ रोजी मंगळवारी कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्ञान प्रबोधिनी, स्वरूपवर्धिनी, समरसता मंच साहित्य परिषद आदी संस्थांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. एक संवेदनशील साहित्यिक, प्रखर सेवाव्रती, निर्मोही कार्यकर्ता, सुविद्य संशोधक आणि उदार मनाचे भीमराव गस्ती होते. त्यांची स्मृती कृतिशील होऊन आपण जपावी आणि त्यांचे कार्य त्यांच्या पाश्चात चालू ठेवावे हीच खरी त्यांना आदरांजली होईल.

***
डॉ. भीमराव गस्ती

९९