पान:विश्व वनवासींचे.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे काम केलेले आहे, जेव्हा त्यांनी लावलेली व वाढवलेली झाडे दिमाखाने हिरवीगार होऊन डोलू लागतील तेव्हा त्यांच्या कार्याचे मूल्य आपल्या समाजाला कळेल.

 आज ते देवदासींसाठी स्थापन केलेल्या 'उत्थान' संस्थेचे अध्यक्ष असून महाराष्ट्रातील आणि कर्नाटक राज्यातील 'बेरड' व रामोशी जमातीच्या विकासासाठी कार्य करीत आहेत. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत संशोधक पदाचा राजीनामा देऊन त्यांनी पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतले हे खास वैशिष्ट्य आहे. १९७४ पासून गेली २८ वर्षे सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभागी होऊन आपले व्यापक कार्य सिद्ध केलेले आहे. पुण्याच्या 'साधना', मुंबईच्या 'पूर्वा' तसेच अनेक वर्तमानपत्रात 'बेरड', 'रामोशी' जमातीच्या संबंधात आणि समाजाच्या समस्यांबाबत त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणूनच त्यांना श्री संत गाडगेबाबा समरसता पुरस्कार, डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे यांचा डॉ. अरुण लिमये पुरस्कार, पुण्याच्या साधवी ट्रस्टचा डॉ. विल्सन पुरस्कार, हैदराबाद येथील आंध्रप्रदेश सरकारचा आदिवासी सेवा पुरस्कार, निपाणी जैन युवा ग्रुपचा अरिहंत सेवा पुरस्कार, मुंबईच्या लेखक सेवा महासंघाचा समाजसुधारक आगरकर पुरस्कार इत्यादी लाखांच्या पुरस्कारांनी त्यांना आजपर्यंत गौरविण्यात आलेले आहे.

 त्यांच्या कामाचा थोडक्यात तपशील सांगावयाचा तर उत्तम संघटन कौशल्य त्यांच्या ठिकाणी आहे. 'उत्थान', बेरड-रामोशी सेवा समिती यासारख्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. पंतप्रधानांपर्यंत आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी निवेदने दिली. देवदासींच्या, रामोशींच्या विकासाचा व पुनर्वसनाचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांनी निमूटपणे भोगलेल्या वेदना साकार करण्याकरिताच लेखन केलेले आहे. त्याचबरोबर आपल्या समाजाची ओळख व्यापक समाजाला व्हावी त्यासाठी 'बेरड' व 'आक्रोश' या आत्मकथनाचा जन्म झालेला आहे. हजारो भूमिहीन शेतकऱ्यांना ५ हजार एकर शेतजमीन मिळवून दिलेली आहे. त्यामुळे ३२० कुटुंबांचे पुनर्वसन झालेले आहे. सेवा समितीमार्फत दोन हजार बेरड-रामोशी युवकांना सुरक्षित नोकरी मिळवून

९८
विश्व वनवासींचे