पान:विवेकानंद.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन.

८९

जेत, असें आम्हा हिंदु लोकांचें प्राचीन काळापासून मत आहे. मी जें विवेचन पुढे करणार आहे त्यांत आपणांस सांख्यशास्त्राची माहिती प्रथम देण्याचा माझा विचार आहे. सांख्यदर्शन हे केवळ आर्यावर्तातीलच नव्हे तर साऱ्या जगांतील जुनें दर्शन आहे असे म्हणावयास हरकत नाहीं. या दर्शनाचे आद्य प्रवर्तक श्रीकपिल मुनि हे होत. हिंदुस्थानांत यानंतर अनेक दर्शनें आणि मतें अस्तित्वांत आलीं; तथापि या सर्वोच्या मुळांशीं श्रीकपिलांचें सांख्यदर्शन हेंच आहे. या दृष्टीने पाहतां जगांतील एकंदर दर्शनांचे आद्यजनक कपिल हेच आहेत असें म्हणावयास हरकत नाहीं. कपिल मुनींनंतर जे अनेक दर्शनकार झाले, त्यांनी इतर बाबतींत अनेक निराळीं मतें प्रतिपादन केलीं असलीं तरी, सूक्ष्मेंद्रियसिद्धांतांच्या बाबतींत आणि विश्वोत्पत्तिसंबंधी त्यांनीं कपिलांचाच अनुवाद केला आहे.
 सांख्यदर्शनाबद्दल प्रथम माहिती देऊन नंतर सांख्यदर्शनांतूनच वेदान्ताची उत्पत्ति कशी झाली आणि सांख्यमतानें दर्शित केलेल्या सिद्धांतांपलीकडे वेदा- न्तानें भरारी कशी मारली हे आपणांस दाखविण्याचा माझा विचार आहे. विश्वाची उत्पत्ति आणि रचना यांजबद्दल सांख्यमत आणि वेदान्त यांची एक- वाक्यता आहे; पण सांख्यमताचें द्वैतमतदर्शक पर्यवसान वेदान्तानें कबूल न करतां तो पुढे सरसावला; आणि त्याने सर्व विश्वाची एकात्मता सिद्ध कर ण्याचा यत्न केला. धर्म आणि भौतिक शास्त्रे यांचें कार्य वस्तुतः एकच आहे. सर्व विश्वाची एकात्मता सिद्ध करणें हेंच दोहोंचेंही कार्य आहे. वेदान्तानें हैं कार्य कसें संपादिले आहे हेंच मला आपणांस दाखवावयाचें आहे.