पान:विवेकानंद.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन.

८७

म्हणावयास काय हरकत आहे ? याला अध्यात्मज्ञान असें नांव आहे. अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांत श्रेष्ठ असून मनुष्याचें खरें कल्याण करण्याचें सामर्थ्य तिजमध्ये आहे. या जगांत लौकिक ज्ञानाचे जे कांहीं प्रकार आपण पाहतों ते सर्व केवळ छायारूप आहेत. खऱ्या ज्ञानाचें अस्पष्ट प्रतिबिंब मात्र त्यांत पडले आहे. वास्तविक त्यांची किंमत याहून अधिक नाहीं.
 आतां आणखीही एका प्रश्नाचा विचार करावयाचा आहे. आपल्या या एकंदर जीविताचें आणि त्यांतील अनेक प्रकारच्या धडपडींचें अंतिम साध्य काय आहे ? मनुष्यजातीनें एकसारखें सुधारत असावें हाच मानवी जीवि- ताचा हेतु आहे असें कित्येक म्हणतात. त्यांच्या मतें पूर्णत्व अशी कांहीं स्थिति नसून मनुष्याच्या जीविताचा तो हेतूही नाहीं. त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ काय हेंही लक्ष्यांत येणे खरोखर कठीण आहे. त्याला कांहींही अर्थ असला अगर नसला तरी हैं म्हणणे तर्काला रुचत नाहीं हें मात्र खरें. एकसारखी एकाच दिशेनें गति होणे कधीं तरी शक्य आहे काय ? आपण एखादी सरळ रेषा एकसारखी एकाच दिशेनें वाढवित गेलों तर ती वर्तुलाकार होऊन पुन्हा पूर्वस्थळीं परत येईल. हीच गोष्ट आपल्या जीवितासही लागू आहे. मनुष्यप्राणी परमेश्वरापासून निघाला असून, त्याची खटपट परमेश्वराकडे जाण्याकरितांच चालू आहे. याप्रमाणें आदि व अंत परमेश्वर; आणि मध्यें मानवी जीवित अशी स्थिति आहे. तुमच्या ज्या कांहीं खटपटी अनंतकाल चालू आहेत, अथवा ज्या अनंतकाल चालू राहतील, त्या सर्व या मधल्या स्थितींतील असून त्यांचें अंतिम साध्य परमेश्वराची भेट हेच आहे.
 या गोष्टी कबूल केल्या तरी आणखीही एक प्रश्न उद्भवतो. धर्मज्ञानाच्या बाब- तींत ज्या कांहीं गोष्टी सत्य म्हणून आजपर्यंत ठरल्या आहेत, त्यांहून कांहीं नव्या सत्य गोष्टींचा शोध आपणांस लागणार आहे काय ? या प्रश्नाला होय आणि नाहीं असें दुहेरी उत्तर देतां येतें. धर्मज्ञानाच्या बाबतीत आतां कांहीं नवा शोध लावतां येणार आहे असें नाहीं. जाणावयासारखें जें कांहीं आहे तें सर्व पूर्वीच जाणलें गेलें आहे. मनुष्य आणि परमेश्वर हे एकरूपच आहेत असें जगांतील सर्व धर्म सांगत आहेत. आम्ही दाखविलेल्या मार्गाने तुम्ही गेल्यास तुम्ही परमेश्वररूप व्हाल असे सर्व धर्म म्हणत आहेत. परमेश्वराशीं एकरूपत्व सिद्ध झालें म्हणजे त्या दृष्टीनें कांहीं करावयाचें शिल्लक उरत नाहीं;