पान:विवेकानंद.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

राहणारच. ज्या योगानें अनंत जीवात्म्याचा संबंध अनंत परमात्म्याशी घडतो तें धर्मज्ञानही अनंतच आहे. तें अमुक क्षणीं आहे आणि अमुक क्षणीं नहीं असे कधीही होत नाहीं. असें आहे तर क्षणैक टिकणाऱ्या जीवाताच्या मापानें त्याची योग्यता ठरवूं पाहणें तर्कशास्त्रास तरी अनुसरून आहे काय ? आपल्या चालू जीविताला त्याचा प्रत्यक्ष उपयोग किती होईल हे पाहून त्या- वरून धर्मज्ञानाची किंमत करणें, हें बालबुद्धीचें आणि अदूर दृष्टीचें लक्षण आहे. असो. पण धर्माच्या बाजूनें हें केवळ निषेधार्थक उत्तर झालें. आतां या प्रश्नाला दुसरी एक बाजू आहे तिचा विचार करूं.
 धर्मज्ञानाचा खरोखर निश्चयात्मक असा कांहीं उपयोग आहे काय ? या प्रश्नाला आम्ही अत्यंत निश्चयात्मक रीतीनें होय असे उत्तर देतों. मनुष्याला चिरकालिक जीवन देणें हें धर्माचें कार्य आहे. मनुष्याला सध्या जी कांहीं स्थिति प्राप्त झाली आहे ती धर्मज्ञानामुळेच असून या स्थितींतून त्याला ईश्व- रत्वापर्यंत वर नेणें हेंही धर्माचेंच काम आहे. धर्मज्ञानाचा उपयोग काय असा प्रश्न करणारांस आह्मी निश्चयात्मक उत्तर असे देतों की तुझांस तें ईश्व- रत्व प्राप्त करून देईल. धर्म जर उद्यां या जगांतून सर्वथैव नष्ट झाला तर काय उरेल? त्यांतील मनुष्यही नष्ट होऊन जग ह्मणजे केवळ पशूंचे साम्राज्य होईल. जंगलांत हिंडणारे पशु आणि अशा स्थितींतली माणसें यांत कसलाच फरक उरणार नाहीं. केवळ इंद्रियांच्या वासना तृप्त करीत बसणे हेच मनु- ष्याचें साध्य नाहीं. मानवी जीविताचा हा हेतूच नाहीं. स्वतः शुद्ध ज्ञानरूप होणें हें तुमचें साध्य आहे. आपण सूक्ष्म दृष्टीने सृष्टीचें अवलोकन केले, तर पशूला इंद्रियजन्यसुखांत ज्या तृप्तीचा लाभ होतो तशी तृप्ति, मनुष्याला केवळ त्याच सुखानें प्राप्त होत नाहीं असे आपणांस आढळून येईल. जड इंद्रियांची तृप्ति एकसारखी होत राहिली तरी, कशाची तरी उणीव त्याच्या मनाला भासत असते. ही उणीव बुद्धिगत असते. यासाठी बुद्धीची तृप्ति कोणत्या मार्गाने होईल याचा विचार तो करीत असतो. पशूच्या इंद्रियजन्य आनंदा- हून हा बुद्धिजन्य आनंद अधिक श्रेष्ठ आहे. आतां, याहूनही मोठा असा एक आनंदाचा प्रकार आहे, तो आत्मानंद होय. बुद्धिजन्य आनंदाहून हा अधिक श्रेष्ट आहे. ज्या अर्थी हा शेवटला प्रकार सर्वात अधिक श्रेष्ठ आहे, त्याअर्थी तो आनंद ज्या ज्ञानानें प्राप्त होईल तें ज्ञान सर्व प्रकारच्या ज्ञानांत श्रेष्ठ आहे असें