पान:विवेकानंद.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन.

८५

वांचून प्राप्त होणार नाहीं; आणि मानवकुलाची कोणत्याच प्रकारची उन्नतीही होणे शक्य नाहीं. “सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील त्याचें। परंतु आधीं भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥'असे संतांचे अनुभवाचे सांगणे आहे.
 धर्म कांहीं राजवाड्यांत अथवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या घरांत राहतो असें नाहीं. धर्मासंबंधी कोणीही कांहीं बोलू लागला तर त्याजविरुद्ध एक मोठा आक्षेप वारंवार ऐकण्यांत येत असतो. “धर्म कशाला हवा? त्याने आमचें अधिक बरे ते काय होणार? धर्म गरिबांना श्रीमंत करील काय?" या गोष्टी धर्माच्याने होणार नाहीत असेंहीं घटकाभर घेऊन चाललों, तरी त्यामुळे धर्माला कांहीं उणेपणा येतो काय? धर्माच्यामुळे ही कार्ये न झाली तरी त्यामुळे धर्म खोटा ठरतो काय? तुम्ही एखाद्या लहान मुलाला रात्रीच्या वेळीं कांहीं तारे आणि ग्रह दाखवित असला आणि मध्येच त्या मुलाने जर तुम्हाला म्हटले की हे समजल्याने मला कांहीं खाऊ मिळेल काय?' तर तुम्ही त्यावर काय उत्तर द्याल बरें ? 'नाही' असेच तुम्हांला म्हणावे लागेल. यावर तुम्हांला तो ह्मणेल की हे सारे ज्ञान फुकट आहे. मुलांचा हा स्वभावच आहे. साच्या विश्वाची किंमत ती आपल्या खाऊच्या पुड्याशीं तोलून करतात. साच्या विश्वाच्या ज्ञानाहून खडीसाखरेच्या एका खड्याची किंमत त्यांस अधिक वाटते. इसापनीतींत एक कोंबड्याची गोष्ट लिहिली आहे. एक कोंबडा एके वेळी उकिरड्यावर फिरत असतां त्याला एक हिरा सांपडला. तेव्हां त्याकडे पाहून कोंबडा म्हणाला, 'अरे, तू कितीही चमकलास तरी जोंधळ्याच्या एका सडक्या दाण्याची, किंमत तुजहून अधिक आहे.' हे भाषण कोंबड्याला शोभण्यासारखेच आहे. पण अनेक पावसाळे ज्यांवरून गेले आहेत अशा वयोवृद्ध मनुष्यांनीही या कोंबड्याची अथवा लहान मुलाची बरोबरी करण्याची हांव बाळगावी हे त्यांस लांछनास्पद नाहीं काय? निरनिराळ्या वस्तू जोखण्यास कांटे आणि वजनेही निरनिराळी लागतात हे लक्ष्यांत ठेवले पाहिजे. अनंत ज्ञानाचा विस्तार अजमावण्याला कांटाही अनंत पाहिजे. बिंदुवत् जगाच्या मापानें अनंत विस्तार मापू पाहणे खचित शहाणपणाचें नाहीं. धर्मज्ञान हे केवळ चालू जीवितापुरतेच उपयोगी आहे असे नाहीं. धर्मज्ञान मनुष्याच्या अस्तित्वाबरोबर सर्वकाळ टिकणारे आहे. पूर्वजन्मीं तें त्याजबरोबर होते, चालू जन्मीं आहे आणि पुढील जन्मीही ते त्याजबरोबर