पान:विवेकानंद.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन.

८३

म्हटला म्हणजे मनुष्य हाच होय.” त्यावर त्या ब्राह्मणानें त्याला म्हटलें, “पर- मेश्वराची ओळख झाल्याखेरीज मनुष्याची खरी ओळख होणे शक्यच नाहीं. आपल्या जीवनक्रमाचें कोर्डे सोडवावयाचें असेल तर प्रथम परमेश्वराची भेट घेणें अवश्य आहे. परमेश्वराचें स्वरूप अनेकांस आजतागाईत अज्ञात राहिलें आहे. कित्येकांच्या मतें तें अज्ञेयच आहे; दुसरे कित्येक म्हणतात कीं तं केवलरूप आहे; आणखी कित्येक त्यास अनंत असेही नांव देतात. त्याला तुम्हीं नांव कोणतेंही द्या. अमुक एका नांवांतच कांहीं विशेष महत्त्व आहे असें नाहीं. मुख्य मुद्दा इतकाच कीं, मानवी जीविताचें अगम्य म्हणून वाट णारें कोडे सोडविण्यास त्यापलीकडील अनंत जीवितांत प्रवेश करणे भाग आहे. आपल्या दृष्टीनें दृश्य अथवा ज्ञेय असें जें आपलें जीवित, त्याचा अर्थ बरोबर समजण्यास, अनंतजीविताचा आधार घेतला पाहिजे हैं म्हणणें विवेचक - बुद्धीच्या विरुद्ध नाहीं. एखाद्या सामान्य शास्त्राचा अभ्यास करावयाचा म्हटला तरी त्यांत देखील, मी म्हणतों या तत्त्वाचा अंगीकार अवश्य करावा लागतो असें आपल्या लक्ष्यांत येईल. एखादें जडशास्त्रच आपण उदाहरणार्थ घेऊं. रसायनशास्त्राचा अभ्यास पूर्णपणे करावयाचा आपला बेत असला, तर य पदार्थाच्या पृथक्करणापासून सुरवात करून शेवटी अदृश्य पदार्थांच्या स्वरूपाच्या अभ्यासाकडे आपणांस वळावें लागतें. शेवटीं हें जडरूप सूक्ष्म होत होत इतकें सूक्ष्म होते की त्याचा जडपणा नष्ट होऊन जातो; आणि त्याची पुरती ओळख आपणांस करून घ्यावयाची असली तर, त्याच्या अदृश्यरूपाकडे धांव घेऊन तेथें त्याचा पाठलाग करण्यावांचून दुसरें गत्यंतर आपणास उरत नाहीं. या ठिकाणीं भौतिक शास्त्राचें रूपांतर आध्यात्मिक विद्येत होतें. जडविषयाचें रूप सूक्ष्म झाले म्हणजे त्याच्या भौतिकशास्त्राचे रूपांतर अध्यात्मशास्त्रांत व्हावें हैं योग्यच आहे.
 कोणत्याही रीतीनें विचार केला तरी, अध्यात्मविद्येच्या प्रदेशांत कधीं ना कधीं प्रवेश केल्यावांचून गत्यंतरच नाहीं, ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत येईल. यापलीकडच्या प्रदेशांत मनुष्यानें कधींच प्रवेश केला नाहीं तर, त्याचें जीवन एखाद्या वालुकामय प्रदेशासारखें उजाड आणि रखरखीत होईल. वृक्षलता- दिकांच्या अस्तित्वाच्या अभावीं, एखादा प्रदेश ज्याप्रमाणे भयाण आणि रुक्ष वाटतो, त्याचप्रमाणें अध्यात्माच्या राज्यांत ज्यानें चुकूनही कधीं पाऊल टाकले