पान:विवेकानंद.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

पलीकडील प्रदेश हा एक प्रकारचा देखावा आहे. तें एक प्रकारचें स्वप्न आहे. या देखाव्यांत आपण प्रवेश केला तर आपली विवेचकबुद्धि केव्हां आणि कोठें हरवली याचा पत्ताही आपणास लागणार नाहीं. त्या ठिकाणच्या देखाव्याचा अनुभव आपणांस होईल, पण तो देखावा 'जाणला' असे मात्र आपणांस म्हणतां यावयाचें नाहीं. कारण जें कांहीं 'जाणावयाचं' तें विवेचकबुद्धीच्या मर्यादेत असणारच. यासाठी हा प्रदेश 'जाणावयाचा' नसून 'अनुभवा- वयाचा' आहे. मनुष्याचा जन्म या पृथ्वीवर प्रथम झाला, तेव्हांपासून तो या धर्मज्ञानाच्या शोधार्थ भटकत असावा असे मला वाटतें. साऱ्या जगाचा आरंभापासूनचा इतिहास आपण धुंडाळून पाहिला, तर त्यांत धर्माच्या शोधार्य भटकणारी माणसे नव्हतीं असा थोडासाही काळ सांपडणार नाहीं. बुद्धीच्या पलीकडच्या प्रदेशांत काय आहे याच्या शोधार्थ धडपडणारी माणसें मनुष्य- वस्तीच्या आरंभीच्या काळापासूनच असली पाहिजेत. आपण आपल्या एक- ट्याच्याच देहापुरता म्हणजे पिंडापुरता विचार केला तर त्यांत विचार उत्पन्न होतो हे आपणांस कळतें; पण तो विचार कोठून आणि कसा उत्पन्न होतो हें आपणांस कळत नाही. तसेंच तो कोठें आणि केव्हां जातो हेही आपणांस अज्ञातच आहे. तो उत्पन्न झाला म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा मात्र बोध होतो; पण त्याचा आदि आणि अंत यांचा सुगावा आपणांस लागत नाहीं. त्याच- प्रमाणें ब्रह्मांडाचें अस्तित्व असेपर्यंत त्याचा बोध आपणांस होतो; पण ब्रह्मांड दृश्य होण्यापूर्वी काय स्थिति होती अगर तें नष्ट झालें तर काय स्थिति होईल याचें ज्ञान आपणांस होत नाहीं. पिंड आणि ब्रह्मांड यांची उत्पत्ति, स्थिति आणि लय हीं एकाच प्रकाराने होत असावीं काय ? विचार उत्पन्न झाला, भासला आणि त्याचा लय झाला. या परंपरेपैकीं मधल्या अस्तित्वाचा मात्र बोध आपणांस होतो. पहिला आणि शेवटचा असे दोन्ही दुवे आपणांस अज्ञात आणि अज्ञेय आहेत. ही एका पिंडाची गोष्ट झाली. त्याचप्रमाणें ब्रह्मांढ दिसतें तोंपर्यंत तें आपणांस ज्ञात होतें; पण त्याचाही पहिला व शेवटचा दुवा आपणांस अज्ञात आणि अज्ञेय आहे. जणुंकाय पिंड आणि ब्रह्मांड यांचें आदि- मध्यावसान एकाच प्रकारें होतें !
 धर्मज्ञानाची प्राप्ति बाह्यसृष्टीच्या अभ्यासाने होत नसून अंतःसृष्टीच्या अभ्यासानें होते असें आर्यतत्त्ववेत्त्यांचे म्हणणे आहे. आपलें हैं मत ते कशा