पान:विवेकानंद.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सांख्यदर्शन.
उपोद्धात.

 आपल्या इंद्रियांच्या द्वारानें जें आपणांस जाणतां येते व जे आपण विश्व या संज्ञेने ओळखतो, ते उपाधीने बद्ध असून त्यापलीकडे काय आहे हे जाणण्याचे साधन आपणांस नाहीं. आपल्या विश्वांतील अत्यंत दूरचे असे तारे आपण दृष्टीने पाहू शकतो. त्यांचे अस्तित्व दृष्टीने जाणतां येते; पण दुसरे कित्येक तारे असे आहेत की ते आपल्या दृष्टिपथांत अद्याप आलेले नाहींत. त्यांचे अस्तित्व आपण मनाने व बुद्धीने जाणू शकतों. गणिताच्या योगाने अशी तान्यांचे अस्तित्व व त्यांच्या गती यांचे ज्ञान आपणास होऊ शकते. पण हे विश्व दृश्यत्वास येऊन आपल्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होण्याच्या अगोदर काय स्थिति असावी अथवा हे दृश्य विश्व नाहीसे झाले तर पुढे काय स्थिति होईल याची कल्पना आपणांस करता येत नाहीं. दृश्य विश्वाच्या आधी काय असेल व नंतर काय होईल हे जाणण्याची साधनें आपणांस उपलब्ध नाहींत. विश्व दृश्यत्वास आले ह्मणजे ते आपल्या इंद्रियांच्या आटोक्यांत येते व त्यामुळे त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणांस होऊ शकते. पण अदृश्यस्थिति ही इंद्रियांच्या आटोक्या बाहेरील स्थिति आहे. या अज्ञेय आणि अज्ञात स्थितीचाच शोध आता आपणांस करावयाचा आहे. या अज्ञेय आणि अज्ञात स्थितीचें जें ज्ञान त्यांतूनच धर्माची उत्पत्ति झाली आहे. आपल्या या जगांत ज्या ज्ञानाला आपण धर्म अशी संज्ञा दिली आहे ते ज्ञान याच अज्ञेय व अज्ञात स्थितींतून प्राप्त झाले आहे. धर्मज्ञानाचा प्रदेश वस्तुतः इंद्रियांपलीकडे आहे. ही गोष्ट केवळ जड इंद्रियांसच लागू आहे असे नाही. आपली विवेचकबुद्धि जेथपर्यंत पोहोंचू शकते त्याही मर्यादेपलीकडे धर्मज्ञानाचा प्रदेश आहे. आपली विवेचकबुद्धि कितीही तीव्र झाली तरी ती या प्रदेशांत जाऊ शकत नाहीं. एखाद्या अत्यंत मनोरम प्रदेशांत आपण गेलो असतां आपणांस तेथील देखाव्यानें अननुभूत आनंद होतो. हा आनंद कसा होतो आणि कां होतो याचा पत्ता आपल्या विवेचकबुद्धीच्या बळावर आपणांस कधी तरी लावता येईल काय? आनंद का झाला असा प्रश्न आपणांस कोणी केला तर, ‘देखावा पाहून.' इतकेंच उत्तर फार तर आपणांस देता येईल. त्याचप्रमाणे विवेचकबुद्धीच्या