पान:विवेकानंद.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

७१


असत. चिनी लोक लोखंडाच्या जाड नळांतून भुतें आणि राक्षस कोंडून ठेव- तात आणि त्याला विस्तव लावतांच हे राक्षस मोठाल्या आरोळ्या मारीत बाहेर पडतात व शत्रूच्या सैन्यांत शिरून पुष्कळ लोकांचा फडशा पाडतात असें इतर लोक त्यावेळी समजत असत.
 त्यावेळीं सैन्याला चतुरंगें असत. पदाति म्हणजे पायांवर उभे राहून लढ- णारे. तुरग म्हणजे घोडेस्वार. त्याचप्रमाणें हत्तीवर बसणारे योद्धे त्यावेळी असत. एका सैन्यांत एक तुकडी नुसत्या हत्तींवरील योद्धयांचीच असावयाची. तीत शेंकडों हत्ती असत. त्यांच्यावर लोखंडाचें भक्कम चिखलत असे. त्याच- प्रमाणें रथी म्हणजे रथांचा उपयोग करणारे योद्धेही असत. यांपैकीं रथ आणि हत्ती यांचा उपयोग सांप्रत होत नाहीं. या रथांचीं जुनाट चित्रें तुमच्याही पाहण्यांत आली असतील. याप्रमाणें प्रत्येक सैन्यांत चार प्रकारचे योद्धे त्या काळी असत.
 कौरव आणि पांडव यांजमधील युद्धास सुरवात झाली तेव्हां श्रीकृष्ण आपल्या पक्षाकडे असावा अशी दोघांचीही इच्छा होती. पण आपण हातांत शस्त्र धरणार नाहीं असें श्रीकृष्णानें सांगितलें. त्यानें युद्धांत अर्जुनाचें सारथ्य स्वीकारलें होतें, आणि दुर्योधनाला आपले सैन्य दिले होतें.
 कुरुक्षेत्राच्या विस्तीर्ण रणमैदानावर या युद्धास प्रारंभ झाला. या युद्धांत भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन त्याचे सर्व भाऊ आणि दुसरे कित्येक योद्धे व भाऊबंद प्राणास मुकले. दोन्ही पक्षांचा भयंकर नाश या युद्धांत झाला. एकंदर अठरा दिवस हे युद्ध चालू होतें. दोन्हीपक्षांकडे मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य या युद्धांत गुंतलें होतें. यांपैकीं फारच थोडे लोक वांचले. शेवटीं दुर्यो- धन मरण पावला त्यावेळीं हें युद्ध समाप्त होऊन पांडवांचा जय झाला. या युद्धानें सारा देश शोकसागरांत बुडून गेला होता. गांधारी राणी व इतर स्त्रिया यांच्या रुदनानें दशदिशा दुःखित झाल्या. लक्षावधि स्त्रिया अनाथ झाल्या.
 या युद्धांत एक गोष्ट मात्र चिरस्मरणीय अशी घडली आहे. भगवद्गीता हैं अमरकाव्य ज्या प्रसंगी अवनीतलावर अवतीर्ण झालें, तो प्रसंग याच युद्धांतला आहे. याच्या तोडीस बसविण्यासारखा दुसरा ग्रंथ भरतभूमीत अंजून निर्माण झाला नाहीं. आम्हां हिंदु लोकांचा हा परमपवित्र आणि परमपूज्य ग्रंथ आहे. भगवान् श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद यांत आहे.