पान:विवेकानंद.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

६९


केली. परंतु दुर्योधनाने युधिष्ठिराचे हे मागणे मनास आणलें नाहीं. पांडवांच्या बद्दल पक्का द्वेष त्याच्या मनांत भरला होता. त्यांच्या न्यायाच्या मागण्याकडेही त्याने लक्ष्य दिलें नाहीं. अर्धे राज्य तर बाजूलाच राहिले; पण एखादा प्रांत अथवा पांच गांवही त्यांस देण्याचें नाकारले. युद्ध केल्याशिवाय एखादा गांव देणार नाहीच पण सुईच्या अग्राइतकी भूमीही मी पांडवांस देणार नाही, असा स्पष्ट जबाब त्याने वकिलाला दिला. त्याचा बाप धृतराष्ट्र यानेही त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ यत्न केला. पांडवांशीं समेट करण्याबद्दल त्याने दुर्योधनाला अनेक प्रकारे उपदेश केला; पण त्यांचा कांहीं उपयोग झाला नाही. नंतर यदुकुलश्रेष्ठ भगवान् श्रीकृष्ण यांनीही शिष्टाई केली. युद्ध करून व्यर्थ प्राणहानी होऊ नये म्हणून दुर्योधनपक्षीय शहाण्या मनुष्यांनीही त्याला सांगून पाहिले; परंतु या सर्व प्रयत्नांस कांहीं यशःप्राप्ति झाली नाहीं. शेवटी दोन्ही पक्षांनी युद्धाची कडेकोट तयारी केली. आर्यावर्तीतील सर्व राष्ट्रांचे अधिपति -या युद्धांत कोणत्याना कोणत्या पक्षाकडे सामील झाले होते.
 पूर्वापार चालीप्रमाणे या युद्धास आरंभ झाला. त्या वेळीही युद्धाचे विशेष नियम असत. त्यांस अनुसरूनच तेव्हां युद्धे होत असत. युधिष्ठिरानें आपल्या पक्षाकडील सर्व राजांस बोलावणे करून आपल्या बाजूला येण्याविषयी त्यांस विनंति केली. दोन पक्ष युद्धास सिद्ध झाले असता त्यांपैकी ज्याकडून प्रथम बोलावणे येईल त्याच्या बाजूला जावयाचे हा त्या वेळीं क्षात्रधर्म समजला जात असे. त्याप्रमाणे कौरव व पांडव यांजकडून बोलावणीं जातांच सर्व देशांतुन राजेलोक या अथवा त्या पक्षाकडे जमा झाले. प्रथम बोलावणे येईल तिकडे जावयाचे अशी क्षात्रनीति असल्यामुळे कित्येक वेळां एक भाऊ एका पक्षाकडे व दुसरा दुस-याकडे; अथवा बाप एक बाजूला व मुलगा दुस-या बाजूला या प्रमाणेही प्रकार घडून येई. त्यावेळची युद्धनीति सध्याहून फार भिन्न होती. त्यांतील कित्येक नियम सध्या आपणांस चमत्कारिक वाटण्यासारखे आहेत. सायंकाळ होऊन त्या दिवसाची लढाई संपली की परस्पर शत्रुभाव विसरावयाचा असा तेव्हां नियम असे. एकमेकांचे सैनिक खुशाल एकमेकांच्या तंबूत जावयाचे, पण सकाळ झाली की पुन्हा लढाईची सुरुवात पूर्वीप्रमाणेच निकराने व्हावयाची. मुसलमानांची स्वारी हिंदुस्थानावर येइपर्यंत हिंदुस्थानांत अशाच प्रकारचे नियम अस्तित्वात होते. त्याचप्रमाणे प्रत्येक