पान:विवेकानंद.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


त्याला कित्येक प्रश्न विचारले असतां राजा युधिष्ठिरानें त्यांची समर्पक उत्तरें दिली. त्यांपैकी एक प्रश्न असा होताः-या जगांत अत्यंत मोठे आश्चर्य कोणतें ?: “आपल्या आजूबाजूला शेंकडों माणसे मरत असल्याचें प्रत्यहीं पाहत असतां आपण चिरंजीव आहों असें मनुष्याला वाटतें हेच अत्यंत मोठे आश्चर्य.” असें उत्तर राजा धर्मानें दिलें. दुसरा एक प्रश्न:- “ धर्मरहस्य जाणण्याचा मार्ग कोणता?” युधिष्ठिरानें उत्तर दिलें, “वादविवाद करून निश्चितार्थ समजत नाहीं. मतें अनेक आहेत. श्रुतिस्मृति अनेक असून परस्परास विरोधक दिस-- तात. ऋषिवचनांतही अशीच एकवाक्यता नाहीं. यासाठीं "महाजनो येन गतः स पन्था । " अशा प्रकारची उत्तरें ऐकून यक्ष म्हणाला, “राजा, तुझीं उत्तरें ऐकून मला फार संतोष झाला आहे. मी यमधर्म असून तुझी परीक्षा पाहण्याकरितांच येथें आलों. तुझे बंधू खरोखर मृत झालेले नाहीत. माझ्या शापवलानें ते मृतवत् पडले आहेत इतकेंच. तूं अहिंसेचें तत्त्व पूर्णपणे पाळलें आहेस; तूं अजातशत्रु आहेस; त्या अर्थी तुझे बंधू तुला पुन्हा प्राप्त होवोत.” यक्षानें असें म्हणतांच सर्व पांडव उठून उभे राहिले.
 राजा युधिष्ठिराच्या स्वभावविशेषाची या गोष्टींत एक छटा दाखविली आहे. त्यानें दिलेल्या उत्तरांवरून तो केवळ सत्ताधीश राजा नसून खरोखर योगी आणि तत्त्ववेत्ता होता, असें दिसून येतें.
 याच सुमारास त्यांच्या वनवासाचे दिवस संपत आले असल्यामुळे अज्ञात- वासाकरितां विराट राजाच्या नगरांत जाण्याविषयीं यक्षानें त्यांस आज्ञा केली. त्याप्रमाणें निरनिराळे वेष घेऊन ते विराट राजाच्या घरी गेले आणि त्याच्याच सेवेंत राहिले. युधिष्ठिर हा कंकभट होऊन राजाबरोबर द्यूत खेळ- ण्यासाठीं राहिला. भीम पाकगृहांत योजिला जाऊन बल्लव झाला. अर्जुन बृहन्नडा होऊन राजकन्या उत्तरेला नृत्य शिकविण्याकरितां राहिला. नकुलाकडे अश्वशालेचें काम सोपविण्यांत आले. सहदेवाची योजना गोशालेकडे झाली. द्रौपदी दासी होऊन राणीच्या सेवेला राहिली. अशा रीतीनें विराट राजाच्या घरीं त्यांनी आपल्या अज्ञातवासाचें वर्ष घालविलें. दुर्योधनानें अनेक प्रकारें त्यांचा शोध चालविला होता; पण त्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले. तें वर्ष संपतें न संपतें तोंच ते पुन्हां प्रकट झाले.
 त्यानंतर राजा युधिष्ठिरानें धृतराष्ट्राकडे शिष्टाई करण्याकरितां एक वकील पाठवून आपले अर्धे राज्य आपणास परत द्यावें अशी त्याजपाशीं मागणी