पान:विवेकानंद.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

६७



 आतां आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूं. पांडव वनवासास गेल्याचा भाग अगोदर सांगितलाच आहे. तेथेंही दुर्योधन त्यांच्या पाठीला हात धुऊन लागला होता. त्यांच्या नाशाकरितां त्यानें अनेक उपाय योजून पाहिले पण ते सर्व फुकट गेले.
 अरण्यांतील त्यांच्या जीवनक्रमांतील एक कथा आपणांस सांगतों. अरण्य- वासांत असतां एके दिवशीं धर्मराजा फार तृषाक्रांत झाला होता. त्यानें आपला बंधु नकुल यास पाणी आणण्याकरितां पाठविले. जवळच एक सरो- वर होतें तेथें तो गेला आणि आतां पाण्याला हात लावणार तोच शेजारच्या एका वृक्षावरून त्याला पुढील शब्द ऐकूं आले. "अरे थांब, माझ्या प्रश्नाचें अगोदर उत्तर दे आणि नंतर पाण्याला स्पर्श कर. ," नकुलानें त्याकडे लक्ष्य न देतां तो सरोवरांतील पाणी प्याला आणि तेथेंच मृत होऊन पडला. बराच वेळ झाला तरी नकुल परत येत नाहींसें पाहून युधिष्ठिरानें सहदेवाला त्याच्या शोधासाठीं व पाणी आणण्यासाठी पाठविलें. त्याच्या सांगण्याप्रमाणे सहदेव गेला आणि फिरतां फिरतां त्या सरोवरावर आला. तेथें येऊन पहातो तो आपला भाऊ मरून पडला असल्याचें त्यास दिसून आलें. आपल्या बंधूची ही स्थिति पाहून त्याला अत्यंत खेद झाला; पण तो तसाच पाणी आण- ण्याकरितां सरोवराकडे गेला. तेथें जातांच त्याला तेच शब्द पुन्हा ऐकूं आले. 'मुला, माझ्या प्रश्नाचें उत्तर अगोदर दे आणि नंतर पाणी पी." त्यानेही त्या शब्दांकडे लक्ष्य दिलें नाहीं. पाणी पिऊन सरोवराबाहेर येतांच तोही मरून पडला. आपले दोघेही बंधू परत आले नाहींत असे पाहून युधिष्ठिरानें अर्जुन व भीम यांस पाठविलें; पण त्यांचीही तीच गत झाली. शेवटीं युधिष्ठिर स्वतः त्या सरोवरावर आला; आणि आपल्या बंधूंची ती अवस्था पाहून अत्यंत शोकाकुल होऊन रुदन करूं लागला. इतक्यांत त्यालाही एक भाषण ऐकूं आलें. "मी एक यक्ष येथील रहिवासी आहे. मी बगळ्याच्या रूपानें येथे फिरून लहान लहान मत्स्य भक्षण करीत असतो. माझ्या शापामुळेच तुझ्या भावांस मृत्यु प्राप्त झाला आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरें तूं न देशील तर तुलाही त्यांच्याच पंथाला जावें लागेल. माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन मग लागेल तितकें पाणी पी अथवा घरींही घेऊन जा." युधिष्ठिर म्हणाला, "आपण प्रश्न विचारावे. माझ्या बुद्धीप्रमाणे मी त्यांची उत्तरें देईन. " यक्षानें