पान:विवेकानंद.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


पावलांचा शब्द ऐकूं येऊ लागला. बिचारी सावित्री अजूनही त्याच्यामागे जात होती. यम पुन्हा मार्गे वळून म्हणाला, “बाळे सावित्री, आतां माझ्यामागे येऊन तुला कांहीं फलप्राप्ति होणार नाहीं. " सावित्री म्हणाली, “माझ्या आत्म्याला घेऊन आपण जातां आणि मी मागें राहावें म्हणतां हैं कसें ? माझें शरीर आतां माझ्या ताव्यांत नाहीं. " यम म्हणाला, "सावित्री, कल्पना कर की तुझा भर्ता अत्यंत पापी असला आणि त्याकरितां नरकवासाची शिक्षा त्याला होणार असली तर तूं त्याबरोबर कशी जाशील बरें ? " सावि- त्रीनें उत्तर दिलें, “देवा, माझे पूज्य पति जेथें असतील तेथे जाणे हेच माझें सुख, ते स्वर्गात असोत अगर दुसऱ्या कोठें असोत, त्यांचें जें ठिकाण तेंच माझें पुण्यक्षेत्र; तीच माझी सुखभूमि. ” यम म्हणाला, “पुण्यशीले, तुझ्या भाषणानें मी संतुष्ट झालों आहे. आणखीही वर माग- पण मृत मनुष्यें जिवंत होत नसतात हें मात्र ध्यानांत धर. " सावित्री म्हणाली, “आपली मर्जी असली तर माझ्या सासऱ्याचा वंशच्छेद होऊं नये एवढेच माझें मागणें आहे. सत्यवानाला पुत्र होऊन त्यांना माझ्या सासऱ्याचें राज्य मिळावें. " सावित्रीचें हैं भाषण ऐकून यम हंसून म्हणाला, “प्रियकन्ये, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. जा. तुझा पति पुन्हा जिवंत होऊन त्याला पुत्र होतील. त्यांना राज्यासन प्राप्त होईल. बाळे, आतां जा घरीं. प्रेमाला वश न होणारा असा या जगांत कोण आहे! प्रेमावर साक्षात् मृत्यूही आपला अंमल गाजवूं शकत नाहीं. तुझ्यासारखें प्रेम मला इतर स्त्रियांच्या ठिकाणीं आजपर्यंत आढळले नाहीं. खरें प्रेम हीच या जगांतील चिरस्थायी वस्तु आहे. मी प्रत्यक्ष मृत्यु असतां प्रेमाचा पाश माझ्यानेंही तोडवला नाहीं, इतकेंच लक्ष्यांत ठेव."
 सावित्रीची कथा याप्रमाणे आहे. सावित्रीचें व्रत आचरणें हाच कित्ता आमच्या आर्यस्त्रियांपुढे ठेवलेला आहे. आपल्या प्रेमाच्या बळावर प्रत्यक्ष मृत्यूलाही जिंकलें, तिच्याचसारखें वर्तन आमच्या आर्यस्त्रियांनी करावे अशी त्यांच्या जन्मभूमीची इच्छा आहे.
 अशा प्रकारच्या शेंकडों सुंदर कथा महाभारतांत जागोजाग गोंविल्या आहेत. महाभारत हा जगांतल्या अत्युत्कृष्ट ग्रंथांतला एक ग्रंथ आहे हे मी अगोदर सांगितलेंच आहे. त्याची एकंदर अठरा पर्ने अथवा भाग असून एक- वर ग्रंथ सुमारे एक लक्ष आहे.