पान:विवेकानंद.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


ण्यांत जात असे. तेथें कंदमुळे व वाळलेल्या काटक्याकुटक्या गोळा करून तो आश्रम आला म्हणजे सावित्रीनें पाकनिष्पत्ति करावी असा क्रम चालू झाला. अशा रीतीनें त्यांचा काळ सुखानें जातां जातां तो भयंकर दिवस जवळ येत चालला, आणि आतां तर फक्त तीनच दिवसांचा अवकाश राहिला. त्या तीन रात्री सावित्री उपोषित राहिली. त्या तीन रात्री तिनें परमेश्वराच्या आराधनांत घालविल्या. तिच्या नेत्रांतून एकसारखा अश्रुपात होत होता. शेवटीं तो काळदिवस उगवला. त्या दिवशीं तिनें सत्यवानावर एकसारखी नजर ठेवली होती. सत्यवानाबरोबर अरण्यांत जावयास तिनें आपल्या सासू- सासऱ्यांची परवानगी मागितली. त्यांनींही परवानगी दिल्यावरून ती त्या दिवशीं सत्यवानाबरोबर अरण्यांत गेली. एकाएकीं सत्यवानाला अस्वस्थता वाटू लागली. त्याला भोंवळ येऊं लागली, तेव्हां तो सावित्रीला म्हणाला, "माझें ढोकें जड होत आहेसे वाटतें. माझ्या डोळ्यांसही अंधारी येत आहे. मी येथेंच थोडा वेळ विश्रांति घेतों. " हे शब्द कानीं पडतांच सावित्रीचें अंतः- करण अगदी व्याकुळ होऊन गेलें. तथापि तसाच धीर धरून ती म्हणाली, 'महाराज, माझ्या मांडीवर डोकें टेंकून थोडा वेळ विश्रांति घ्यावी. " सावि- त्रीच्या मांडीवर डोके टेंकून सत्यवान पडतो न पडतो तोंच त्याची प्राणज्योति मंद होऊं लागली. सावित्रीने त्याचें मस्तक हृदयाशीं धरलें. तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा एकसारख्या वाहूं लागल्या. त्या निर्जन अरण्यांत तिचें समा- धान कोण करणार? सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरितां येणाऱ्या यमदूतां- च्या कृष्णछाया तिला दिसूं लागल्या. येत येत त्या छाया बऱ्याच जवळ आल्या; परंतु सावित्रीच्या भोंवतीं तीव्र पातिव्रत्याग्नीचें तेजोवलय पसरत असल्यामुळे त्या छाया तिच्या पतीच्या प्राणास स्पर्श करूं शकेनात. थोडा वेळ थांबून यमदूत परत गेले आणि ही सर्व हकीगत त्यांनी यमाला कळविली.
 दूतांनीं सांगितलेली हकीगत ऐकल्यानंतर यम स्वतः त्याठिकाणीं आला. पृथ्वीवर मनुष्याची उत्पत्ति झाल्यानंतर जो पहिला मनुष्य मृत्यु पावला तोच यम झाला आहे. सर्वांचे प्राण हरण करून त्यांच्या बऱ्यावाईट कर्माप्रमाणें त्यांस गति देणें हें या देवतेचें काम आहे. यम स्वतः त्या ठिकाणी आला व सावित्रीच्या जवळ येऊन उभा राहून म्हाणाला, "मुली, तें शरीर आतां तुजपासून दूर कर. जो कोणी या जगांत जन्मास आला त्याला मृत्यु नेमले-