पान:विवेकानंद.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

सर्व प्रकारचे वनचर व जलचर मनुष्याबद्दलची भीति विसरले होते. तळ्यांतील मासेसुद्धां वर येऊन मनुष्याच्या हातांतून पदार्थ खात असत. हजारों वर्षेपर्यंत त्या अरण्यांत कोणीही कधी शिकार केली नव्हती. त्या अरण्यांत साधुपुरुष आणि वृद्ध वानप्रस्थ हे रहावयास जात असत. तेथील शांततेचा भंग केव्हाही होत नसे. फार काय सांगावें, पण अपराधी लोकही पळून येऊन त्या अरण्यांत सुरक्षित राहत असत. एखाद्याला आपल्या जीविताचा आणि संसाराचा कंटाळा आला तर तो त्या अरण्यांत जाऊन राहत असे. त्या ठिकाणीं अनेक सत्पुरुषांची दर्शने घ्यावी, त्यांजपासून धर्मज्ञान संपादावे आणि ध्यानधारणादि साधनांनी उर्वरित आयुष्याचे सार्थक करावे अशा हेतूने कित्येक लोक जात असत.
  द्युमत्सेन या नांवाचा एक राजा होता. त्याच्या शत्रून त्याचे राज्य बळकावले होते. तो राजा अतिशय वृद्ध झाला होता व त्याची दृष्टीही नाहींशी झाली होती. हा अंध राजा आपली पत्नि व पुत्र यांसह याच अरण्यांत येऊन राहिला होता. तेथे तपाचरणांत राहिलेले आयुष्य तो घालवित होता. त्याच्या मुलाचे नांव सत्यवान असे होते.
  फिरता फिरतां सावित्री या राजाच्या झोंपडत आली. अरण्यवासी सत्पुरुषांचा मान ठेवण्याची चाल त्या काली होती. एखादा राजा अथवा महाराजाही अरण्यांत आला आणि त्याच्या नजरेस एखादं झोंपडे पडले तर आंत जाऊन त्यांतील रहिवाशाचे दर्शन घेतल्याशिवाय तो पुढे जात नसे. सत्पुरुषांचा एवढा मान त्या काळी राखला जात असे. मी अमक्या ऋषीच्या कुळांतला असे सांगण्यांत एखाद्या सार्वभौमालाही मोठा अभिमान तेव्हां वाटत असे. आपला एखादा पूर्वज आश्रमवास करून कंदमुळांवर आपला निर्वाह करीत असे ही गोष्ट तेव्हां मोठ्या अभिमानाची समजली जात असे. अमको ऋषि आमचा पूर्वज असे सांगण्यांत आजमितीसही आम्हांला मोठा अभिमान वाटतो. धार्मिक बाबींना अशा प्रकारचा मान हिंदुस्थानांत अजूनही मिळतो. अशा प्रकारच्या एखाद्या आश्रमांत जाण्याचा प्रसंग एखाद्या राजाला आला तर तो घोड्यावरून उतरून पादचारी होई. आपला रथ, घोडे वगैरे महत्त्व दाखविणारे पदार्थ आश्रमाच्या हद्दीच्या बाहेर तो ठेवीत असे. 'विनीतवेषेण प्रविष्टव्यानि तपोवनानि' अशी भावना सर्व राजांच्या