पान:विवेकानंद.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

६१


करावा असा पण लाविला होता. अज्ञातवास म्हणजे कोणीही त्यास ओळखूं नये अशा स्थितीत राहणें. अज्ञातवासाचे वेळी त्याची ओळख कोणाला पटली. तर त्यानें फिरून बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास करावा अशीही एक अट त्यांत होती. हा शेवटचा डावही विचाऱ्या युधिष्ठिराच्या आंगावर आला, आणि पणाप्रमाणें ते पांच बंधू आपल्या भार्येसह वनांत निघून गेले. बारा वर्षेपर्यंत त्यांनी वनवास केला. वनवासांत असतांही त्यांनी अनेक शौ-- र्याची आणि परोपकाराचीं कृत्यें केली. त्यावेळी त्यांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. महाभारतांतील हा कथाभाग अत्यंत मनोरम असून यांत कित्येक अत्यंत सुरस आणि ज्ञानप्रद दंतकथा आणि गोष्टी यांचा संग्रह केला आहे. प्राचीन आर्यावर्तीतील अत्यंत सुंदर आणि उदात्त कथांच्या या संग्रहांत धार्मिक आणि आध्यात्मिक प्रमेयें जागोजाग विखुरली आहेत. पांडव वनवासांत असतां मोठमोठे ऋषी आणि महात्मे त्यांच्या भेटीकरितां येत असत, आणि अनेक कथा सांगून त्यांचें रंजन करून त्यांस उपदेशही करीत यायोगे त्यांचे वनवासाचे कष्ट पुष्कळ हलके झाले. यांपैकी एकच गोष्ट तुम्हांस सांगतो.
 अश्वपति या नांवाचा एक राजा आर्यावर्तात पूर्वकाळी होऊन गेला. त्याला सावित्री या नांवाची एक अत्यंत लावण्यवती आणि गुणवती कन्या होती. ब्राह्मणांच्या अत्यंत पवित्र मंत्रालाही सावित्रीमंत्र असें नांव आहे. त्या कन्येचें पावित्र्य, जणुंकाय, तिच्या नांवानें दर्शित होत होतें ! सावित्री उप- वर झाली तेव्हां वरयोजना करण्याविषयीं तिच्या पित्याने तिला सुचविलें. पूर्वकालीं राजकन्यांना लग्नाच्या बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य होतें. आपणास पसंत पडेल त्या राजपुत्राशीं विवाह करण्यास त्यांना पूर्ण मोकळीक होती.
 एका सुवर्णरथांत बसून सावित्री प्रवासाला निघाली. ती अनेक देश फिरली. तिच्याबरोबर संरक्षणार्थ कांहीं माणसें तिच्या पित्याने दिली होती. तिनें निरनिराळे देश अवलोकन केले आणि कित्येक राजपुत्रही पाहिले; पण त्यां पैकी कोणीच तिच्या पसंतीला उतरला नाही. शेवटीं फिरतां फिरतां ती एका अरण्यांत आली. कित्येक अरण्यें पशूंसाठी राखून ठेवण्याची चाल त्या काळी हिंदुस्थानांत होती. त्या अरण्यांतील पशूंचा वध कोणीही करूं नये अशी ताकीद राजाकडून दिली जात असे. ज्या अरण्यांत सावित्री गेली होती तें अरण्य अशांपैकींच एक होतें. या अरण्यांतील पशु मनुष्याला भीत नसत.