पान:विवेकानंद.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.
महाभारत.

५९


 अशा प्रकारचा विवाह विहित आहे की काय याबद्दल तेव्हांही मोठी भवति न भवति झाली; परंतु श्रीव्यासांनी हा विवाह इष्ट आहे असे सांगितल्याव- रून तो समारंभ पार पडला. दुपदराजानेही श्रीव्यासांचें वचन मान्य करून द्रौपदीचा विवाह त्या पांच बंधूंशी करून दिला.
 यानंतर पांडव कांहीं काळ सुखासमाधानानें राहिले. त्यांचें सामर्थ्यही दिवसेंदिवस वाढत गेलें. त्यांचा नाश व्हावा म्हणून दुर्योधनानें व त्याच्या पक्षाच्या लोकांनी अनेक प्रकारचे उपाय योजिले, परंतु त्यांचा कांहींच उपयोग झाला नाहीं. शेवटीं धृतराष्ट्रराजाने त्यांना राजधानीला बोलावून नेलें व त्यां-- च्याशीं आपल्या पुत्रांचा संधि करविला, व युधिष्ठिराला अर्धे राज्य दिले. पांडवांनी आपल्याकरितां इंद्रप्रस्थ नांवाचें एक नवें शहर वसविले आणि ते तेथें राहूं लागले. त्यांनी आपल्या शौर्यानें आपल्या राज्याचा विस्तारही वाढविला. त्यानंतर राजा युधिष्टिरानें एक राजसूय यज्ञ करण्याचा बेत केला. राजसूय यज्ञ हा सार्वभौमराजाने करावयाचा असे. यज्ञाच्या वेळीं सर्व मांडलिक राजे येऊन स्वतःच्या अंगमेहनतीनें यज्ञाच्या कार्यात मदत करीत असत. यादवांचा अधि पति श्रीकृष्ण हा पांडवांचा मोठा मित्र असून शिवाय आप्त असल्यामुळे त्या- लाही हा यज्ञाचा बेत पसंत पडला. परंतु यज्ञ शेवटास जाण्याच्या कामीं एक मोठा अडथळा होता. त्यावेळीं जरासंघ या नांवाचा एक बलाढ्य राजा होता. शंभर राजे बळी देण्याचा त्यानें बेत केला होता, आणि यासाठी त्यानें ८६ राजे बंदींत ठेवले होते. यज्ञसमारंभांत तो विघ्न आणील याकरितां त्याचा बंदोबस्त प्रथम करण्याचा सल्ला श्रीकृष्णानें पांडवांस दिला. श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन यांनी त्यास युद्धास पाचारण केलें. चौदा दिवसपर्यंत भीमाचें व त्याचें मल्लयुद्ध होऊन शेवटी जरासंध मारला गेला आणि श्रीकृष्णानें बंदींत ठेविलेल्या सर्व राजांस मुक्त केलें.
 यानंतर पांडवांपैकी चौघेजण निरनिराळ्या दिशांनीं विजयाकरितां गेले. त्यांनी कित्येक लढाया जिंकून कित्येक राजांस युधिष्ठिराच्या पायीं शरण आणलें. ते परत आले त्यावेळी अपार संपत्ति त्यांनी बरोबर आणली होती. याप्रमाणें त्या महायज्ञाला लागणाऱ्या सर्व सामुग्रीची सिद्धता झाली.
 यज्ञसमारंभाकरितां जिंकलेले सर्व राजे व जरासंधाच्या बांदशाळेतून मुक्त केलेले राजेही आले होते. त्या सर्वांनी राजा युधिष्ठिराचें सार्वभौमत्व कबूल.