पान:विवेकानंद.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


कांहीं त्यांस मिळे त्यावर ते निर्वाह करीत असत. त्यांच्या आईचें नांव कुंती असें होतें. नेहमीप्रमाणें ते त्या दिवशीही घरी जाऊन बाहेरूनच मोठ्यानें म्हणाले, “आई, आज आम्हांस अपूर्व भिक्षा मिळाली आहे. " कुंती म्हणाली, "बरें बाबांनो, ती तुम्ही सर्वजण वांटून घ्या. " असे म्हणत म्हणत ती बाहेर आली आणि पाहते तो ती सुंदर राजकन्या तिच्या दृष्टीला पडली. तिला पाहून कुंती म्हणाली, "अरे, माझ्या तोंडांतून काय हे चमत्कारिक शब्द बाहेर पडले !” मातेचा शब्द खाली पडूं द्यावयाचाच नाहीं असा पांचही जणांचा कृतनिश्चय होता. माता म्हणेल तें केलेच पाहिजे अशी त्यांची प्रतिज्ञा होती. आपल्या मातेचा शब्द खरा करण्याकरितां त्या पांचही बंधूंनी द्रौप- दीशीं विवाह केला.
 प्रत्येक मानवसमाजाची उत्क्रांति पायरीपायरीनें होत असते, हा सिद्धांत आपणा सर्वांच्या अनुभवांतलाच आहे. प्रस्तुत काव्यांतही मानवसमाजाच्या उत्क्रांतीचे निरनिराळे आदर्श दिसून येतात. एकाच स्त्रीशीं पांचजणांनीं विवाह केला ही गोष्ट काव्यलेखकानें चोरून न ठेवतां स्पष्ट नमूद केली आहे खरी; तरी पण ती गोष्ट सकारण होती असे दाखविण्याचा यत्नही त्यानें केला आहे. ती मातेची आज्ञा होती, आणि मातेची आज्ञा सर्वथा अनुल्लंघनीय आहे असें त्यानें ध्वनित केले आहे. प्रत्येक राष्ट्राचा पूर्वापर इतिहास पाहिला तर अशा प्रकारची अनेकपतित्वाची चाल सर्व देशांत होती असे आपणांस आढ- ळून येतें. एखाद्या कुटुंबांतील तीन चार भावांनी एकाच स्त्रीशी लग्न करण्याची चाल सर्व देशांत प्रचारांत होती. महाभारताच्या कालीं ही चाल नष्ट होत होती, आणि पांडवबंधूंचें लग्न हे त्या चालीचा अवशेष होता असें दिसून येतें.
 द्रौपदीचा भाऊ इकडे मोठ्या घोटाळ्यांत पडला होता. ज्यानें पण जिंकून आपल्या भगिनीचें पाणिग्रहण केलें तो व त्याचे बंधू कोण असावे याचा तर्क त्याला होईना. त्यांजपाशीं रथ, घोडे अथवा इतर प्रकारची सामुग्री कसलीच नव्हती. ते निवळ पादचारी होते. तो रात्रीच्या वेळीं त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीं गेला आणि ते आपसांत काय बोलतात हें ऐकण्यासाठीं तो बाहेरच उभा राहिला. त्यांचें आपसांतील चाललेले भाषण ऐकून ते खरोखर क्षत्रिय आहेत अशी त्याची खात्री झाली. घरीं येऊन त्यानें ती गोष्ट आपल्या पित्यास कळविली तेव्हां त्यालाही मोठा आनंद झाला.