पान:विवेकानंद.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

५७


 मत्स्यभेद कोणाच्यानेंही झाला नाहीं हे पाहून द्रुपदराजाचा पुत्र पुढे येऊन ह्मणाला, “ आतां क्षत्रिय कोणीच उरला नाहीं काय ? कोणी उरला नाहीं असे दिसतें. तर आतां इतर वर्णांपैकी कोणी वीर असेल तर त्यानें पुढें यावें. ब्राह्मण असो वा शुद्र असो; जो कोणी मत्स्यभेद करील त्याला द्रौपदी चरील. "
 पांच पांडवबंधू ब्राह्मणांच्या जागी बसलेले होते. या पांचबंधूंपैकीं तिस- याचें नांव अर्जुन असे असून तो मोठा धनुर्धर म्हणून प्रसिद्ध होता. द्रुपद राजाच्या मुलाचें भाषण ऐकून तो पुढे सरसावला. ब्राह्मण हे जात्या योद्धे नव्हत. त्यांची प्रकृति शांत आणि भित्री. वर्णाश्रमधर्माप्रमाणे पाहतां एखाद्या घातकशस्त्रास स्पर्श करणेंही त्यांस पातक वाटत असे. त्यांनी शस्त्र कधींही धरूं नये अथवा कोणतेंही साहसाचें कृत्य करूं नये, हीच त्यांची नीति. चिंतन, अध्ययन, अध्यापन आणि इंद्रियदमन करणें हाच त्यांचा धर्म. अशा व्यवसा- याचे ब्राह्मण किती शांत आणि निरुपद्रवी असतील याची कल्पना करा. अर्जुन त्यावेळी ब्राह्मणाच्या वेषांत होता. त्याला पुढे सरसावतांना पाहून ब्राह्मणांची मोठी तारांबळ उडाली. हा ब्राह्मण पुढे सरसावून क्षत्रियांचा क्रोध मात्र प्रज्वलित करणार असें त्यांस वाटलें. क्षत्रियांचा क्रोध म्हणजे ब्राह्म- णांचा निःपात असें त्यांस वाटलें. अर्जुनानें हें साहस करूं नये म्हणून त्यांनीं त्याला अनेक प्रकारें बोध करून पाहिला. पण अर्जुनानें त्याकडे लक्ष्य दिलें नाहीं. तो जातीचा क्षत्रिय होता. त्याला असला उपदेश कसा रुचणार! त्या यंत्रासंनिध जाऊन त्यानें अगदीं सुलभपणानें धनुष्य सज्ज केलें, आणि निमि- षार्धात बाणानें मत्स्याचा डोळा फोडला.
 अर्जुन याप्रमाणें विजयी होतांच द्रौपदीने त्याच्या गळ्यांत माळ घातली. पण या त्याच्या कृत्यानें क्षत्रिय मंडळींत मोठी गडबड सुरू झाली. एखाद्या भटुरग्यानें असली अप्सरेसारखी स्त्री उपटावी आणि अनेक क्षत्रियांचा या प्रमाणें पाणउतारा करावा हें त्यांस खपलें नाहीं. या भटाला हें स्त्रीरत्न पचूं द्यावयाचें नाहीं, असा बेत करून ते त्याजवर तुटून पडले; पण त्या पांच बंधूंनी त्यांस दाद न देतां द्रौपदीला घेऊन ते तेथून आपल्या घरी परत आले. ब्राह्मणांचें उदरनिर्वाहाचें मुख्य साधन भिक्षा हॅच असे. पांडव ब्राह्म- णांच्या वेषानें राहत असल्यामुळे तेही भिक्षाटनास जात असत,आणि जें