पान:विवेकानंद.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

काविलें. इकडे पांचहीं पांडव आपली माता कुंती हिच्यासह त्या घरांतून सुरक्षितपणे बाहेर पडून एका अरण्यांत पळून गेले. एका लहानशा गांवांत भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवू लागले. त्यावेळी ते आपणास ब्राह्मणपुत्र ह्मणवीत असत. त्या अरण्यांत भटकत असतां अनेक प्रकारची संकटें त्यांजवर कोसळली. परंतु प्रसंगावधान व शौर्य आणि सावधानता यांच्या बळावर त्या सर्वांतून ते पार पडले. अशा प्रकारे काळ कंठीत असतां एका नगरच्या राजकन्येचा स्वयंवरसमारंभ लवकरच होणार असल्याची बातमी त्यांस कळली.
 हिंदुस्थानांत पूर्वकाळीं चालू असलेल्या स्वयंवरपद्धतीबद्दलची माहिती आपणांस यापूर्वी मी दिलीच आहे. देशोदेशीचे राजे आणि राजपुत्र अशा समारंभास जमत असत; आणि राजकन्या हातांत पुष्पमाला घेऊन त्यांच्या सभेत फिरून सर्वांचे निरीक्षण करीत असे, आणि त्यांतून जो तिला पसंत पडे त्यालाच ती वरीत असे. त्यावेळी द्रुपदराज़ नांवाचा एक पांचाल देशाचा विख्यात राजा होता. त्याला द्रौपदी या नावाची एक कन्या होती. सद्गुण आणि सौंदर्य यांबद्दल तिची कीर्ति सर्वत्र पसरली होती.
 पुष्कळ वेळां हा स्वयंवरसमारंभ एखादा पण लावून होत असे. द्रौपदीच्या स्वयंवराच्या प्रसंगांही एक पण लाविला होता. मत्स्याच्या आकाराचे एक यंत्र उंचावर बांधलेले होते; त्याखाली एक चक्र असून त्याला मध्यभाग छिद्र होते. हे चक्र एकसारखें गरगर फिरत राहील अशी योजना केली होती. या यंत्राच्या खाली जमिनीवर पाण्याने भरलेलें एक पीप ठेविले होते. त्या पाण्यात पडलेल्या वरील मत्स्याच्या प्रतिबिंबाकडे पाहून जो कोणी वरील मत्स्याचा नेत्रभेद करील त्यासच द्रौपदी वरील असा पण यावेळीं लाविला होता. द्रौपदीला प्राप्त करून घेण्याकरिता त्यावेळचे देशोदेशींचे राजे व राजपुत्र आले होते; पण त्यांपैकी कोणीही पण जिंकला नाहीं.
 आमच्या आर्यावर्तीत चार वर्ण आहेत. ब्राह्मण वर्ण हा सर्वांतील श्रेष्ठ होय. त्यानंतर क्षत्रिय हा वर्ण असून त्यांत राजे व इतर धनुर्धारी यांचा समावेश होतो. तिसरा वर्ण वैश्य हा असून व्यापार हा त्यांचा मुख्य धंदा होय. चवथा वर्ण शूद्रांचा. यांनी वरील तिन्ही वर्णांची सेवा करून आपला उदरनिर्वाह करावा. द्रुपद हा क्षत्रिय होता.