पान:विवेकानंद.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाभारत.

 आज आपणांस दुस-या एका वीररसप्रधान काव्याविषयी माहिती देण्याचा माझा विचार आहे. या दुस-या काव्याला महाभारत असें नांव आहे. भरतराजाच्या वंशांत उत्पन्न झालेल्या एका शाखेविषयींचा वृत्तांत या काव्यांत वर्णिला आहे. भरत हा दुष्यंत व शकुंतला यांचा पुत्र होय. महा ह्मणजे मोठा आणि भारत ह्मणजे हिंदुस्थान. भरत आणि त्याचे वंशज यांजपासून हिंदुस्थानाला भारत असें नांव प्राप्त झाले आहे. महाभारत ह्मणजे मोठे हिंदुस्थान; अथवा मोठ्या भारतवंशाचा इतिहास असेही म्हणता येईल. कुरूंचे प्राचीन राज्य हे या काव्याचे स्थल असून कौरव आणि पांडव यांजमधील महायुद्ध हा या काव्याचा विषय होय. या काव्याचे स्थल विस्ताराने फार मोठे आहे असे नाही. हे काव्य हिंदुस्थानांत अत्यंत लोकप्रिय आहे.. होमरची कविता ग्रीक लोकांना जितकी प्रिय तितकेंच हे काव्य आम्हां हिंदुलोकांच्या आवडीचे आहे. काल लौटत चालला तसतशी मूळच्या काव्यांत भर पडत गेली आणि शेवटी त्याचा सुमारे एक लक्ष ग्रंथ झाला आहे. यांत अनेक गोष्टी, दंतकथा, तत्त्वज्ञानाचे विषय, कांहीं इतिहासाचे भाग आणि कित्येक विषयांवरील वादविवाद इत्यादिकांचा अंतर्भाव झालेला आहे. कालांतराने यांत अशा प्रकारची भर पडत जाऊन त्याचा प्रचंड ग्रंथ होत असतां-- ही मूळकथा जशीच्या तशीच राखली गेली आहे.
 धृतराष्ट्र आणि पंड हे दोघे बंधु होते. राज्याबद्दल या दोन बंधूंच्या पुत्रांत जें भयंकर युद्ध झाले, ते या काव्याच्या मध्यबिंदूसारखे असून त्याभोंवत बाकीचा सर्व विस्तार झाला आहे.
 आर्यांचे पूर्वज लहान लहान टोळ्यांनी प्रथम हिंदुस्थानांत आले. त्यानंतर त्यांचा विस्तार हळू हळू वाढत जाऊन शेवटी ते सर्व हिंदुस्थानचे राजे झाले. यानंतर तेथील सार्वभौमत्वासाठी हे महायुद्ध एकाच कुटुंबाच्या दोन शाखांत झाले. भगवद्गीतेच्या आरंभीं रणभूमीचे आणि सैन्याच्या रचनेचे वगैरे वर्णन आहे, ही गोष्ट ज्यांनी भगवद्गीता वाचली असेल त्यांच्या लक्ष्यांत असेलच. ते वर्णन भारतीय युद्धासंबंधीचेच आहे.