पान:विवेकानंद.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
रामायण.

५१


त्या सीतेसारखे व्हावे, ही आमच्या आर्यस्त्रियांची अत्यंत मोठी इच्छा असते. राम आणि सीता यांच्या चरित्राचे सूक्ष्म अवलोकन केले असतां पौर्वात्य आणि पाश्चात्य देशांतील लोकांच्या आदर्शकल्पनांत भेद कोणता आहे तो लक्ष्यांत येतो. शरिराला कष्ट कितीही पडोत, दुःखें कितीही प्राप्त होवोत आणि कोणतीही संकटे येवोत, पण आपल्या दानतींत यत्किचित्ही फरक होऊ द्यावयाचा नाहीं हा सीतेच्या वर्तनाचा आदर्श आर्यांनी आपल्यापुढे ठेविला आहे. पाश्चात्य राष्ट्रांचा आदर्श कर्मप्रवणता हा आहे. एकसारखें कर्म करून आपला मोठेपणा स्थापन करा, असा पाश्चात्य संस्कृतीचा उपदेश आहे. पौर्वात्य संस्कृति याच्या उलट उपदेश करीत आहे. आपलें मोठेपण कष्ट सोसण्यांत आहे असे आर्यसंस्कृतीचे मत आहे. मनुष्याला किती भोग भोगणे शक्य आहे हा प्रश्न पाश्चात्य राष्ट्रं सोडवीत आहेत. उलटपक्षी मनुष्याला आपल्या गरजा किती कमी करता येतील हा प्रश्न आर्यभूमीने सोडविला आहे. या दोन स्थिती परस्परांशी अत्यंत विसदृश आहेत हे आपल्या लक्ष्यांत आले असेलच. सीता हा हिंदु लोकांचा आदर्श आहे. आर्यभूमीच्या सर्व आकांक्षा एकत्र करून त्यांची मूर्ति निर्माण केली तर ती सीतेसारखी होईल. वस्तुतः सीता निर्माण झाली होती की नाहीं, राम खरोखर अस्तित्वांत होता की नाहीं, अथवा त्याचे चरित्र ही केवळ कवीची रचना आहे इत्यादि प्रश्नांशी आपणांला कांहीं कर्तव्य नाहीं. आर्यांचा आदर्श कोणत्या प्रकारचा होता, आणि आपल्या संस्कृतीचा नमुना कोणत्या प्रकारचा असावा याचे उत्तम चित्र येथे आपणांला पाहावयास सांपडते. एकंदर पुराणांपैकीं रामचरिताइतके लोकमान्य झालेले पुराण दुसरें एकही नाहीं. जनतेच्या अगदी वरच्या थरापासून तो थेट तळापर्यंत या पुराणांतील रहस्य लोकांच्या हाडमासीं खेळत आहे. सीता हें नांव सर्वतोमुखीं झालेले आहे. सीता म्हणजे केवळ सौजन्य, शुद्धता आणि पातिव्रत्य यांची जिवंत मूर्तीच! स्त्रीला शोभा देणारे जे जे गुण असावे असे आपणास वाटते ते सर्व सीतेच्या ठायी होते. एखाद्या स्त्रीला आशीर्वाद द्यावयाचा असला तर ‘सीतैसारखी हो.” असें ह्मणतात. सांप्रतचें आर्यावर्त हें सीतेच्या मुलांसारखेच आहे. सीतैसारखें होण्याचा यत्न आज कित्येक युगें ते करीत आहे. अनेक प्रकारची संकटें प्राप्त झाली आणि जिवाचे अगदीं रान झाले तरी रामाविरुद्ध एक अक्षरही तिच्या तोंडून कधी बाहेर पडले नाही. जें जें कांहीं प्राप्त झालें तें तें कर्तव्य