पान:विवेकानंद.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


योजना सहधर्मचारिणीच्या ठिकाणी करण्यांत आली. याच समारंभांत एका नाटकाचीही योजना करण्यांत आली होती. यज्ञसमारंभासाठीं वाल्मीकि ऋषि आपल्या लव आणि कुश या शिष्यांसह आले होते. लव आणि कुश है। रामाचे पुत्र आहेत हे कोणाला ठाऊक नव्हते. यज्ञमंडपांत एक रंगभूमि तयार करण्यात आली होती. राम, त्याचे बंधू, दरबारी लोक व इतर प्रजाजन मिळून मोठा लोकसमूह नाटक पाहण्याकरिता जमला होता. वाल्मीकि ऋषींच्या सांगण्यावरून लव आणि कुश यांनी रामचरिताचे गाणे ह्मणण्यास आरंभ केला. त्यांच्या सुरूपतेने व ह्मणण्याच्या मोहक पद्धतीने सर्व सभा अगदी तटस्थ होऊन गेली होती. स्वतःच्या चरित्राचे पठण ऐकत असतां राम अगदीं तल्लीन होऊन गेला होता. शेवटीं सीतेच्या त्यागाचा भाग निघाला, तेव्हां तर तो शोकाने अगदी मूढ होऊन गेला. त्याची अशी दशा पाहून वाल्मीकि ऋषि ह्मणाले, “रामा, असा बेहोष होऊ नको. मी तुला सीतेला भेटवितो.” मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे सीता पुढे आली असतां रामाने तिला आलिंगन दिले. सीतेची व रामाची याप्रमाणे भेट होत असतां सभेत एक निराळीच कुरबुर सुरू झाली. सीतेने दिव्य केले नाही, याबद्दल कांहीजण पुन्हा बोलू लागले. लोकांच्या या दुष्टपणाने सीता अगदी त्रासून जाऊन ह्मणाली, “पहा, हे दिव्य मी करीत आहे." ती असे ह्मणत आहे तोंच पृथ्वी दुभंग झाली व सीतेने आपल्या मातेच्या उदरात प्रवेश केला. अशा रीतीनें सीता गुप्त झालेली पाहून सर्व लोक अगदीं भयभीत व चकित झाले. रामाच्या दुःखाला तर पारावार राहिला नाहीं.
 सीता गुप्त झाल्यानंतर रामाकडे देवांचा दूत आला व ह्मणाला, “महाराज, आपला येथील कार्यभाग संपला आहे. आतां आपण पुन्हा वैकुंठास चलावें.” हैं भाषण ऐकतांच रामाला स्वतःच्या मूलरूपाचे स्मरण झाले. त्याने शरयु नदीत उडी घेतली. शरयु नदीच्या कांठीच अयोध्यानगर वसलेले आहे.
 याप्रमाणे या वीररसप्रधान काव्यांतील कथाभाग आहे. हे आर्यावतीतील अत्यंत जुनाट काव्य आहे. राम आणि सीता यांची चरित्रे आर्यावर्तीत आदर्शवत् मानली जातात. तेथील सर्व स्त्रिया सीतेची पूजा करीत असतात. एखाद्या स्त्रीची अत्यंत उत्कट इच्छा पाहिली तर सीता होण्याची असते. जी अत्यंत पवित्र आणि अत्यंत प्रेममय असतांही जिने जन्मभर कष्ट सोसले,