पान:विवेकानंद.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
रामायण.

४९


असत. सीतेच्या सहवासांत अत्यंत सुखाचा असा कांहीं काळ लोटल्यावर तिच्याबद्दल लोकांत पुन्हा कुरकुर सुरू झाली. राक्षसाने पळवून नेलेल्या सीतेचा त्याग रामाने केला पाहिजे असे लोक ह्मणं लागले.
 लोकांची मने राखण्याकरितां रामाने सीतेचा त्याग करून तिला वनांत पाठविले. त्या वनांत वाल्मीकि ऋषि राहत होते. दुःखानें व्याप्त व अत्यंत निराश झालेली अशी ती सीता त्या ऋषींच्या नजरेस पडली. तिची सर्व हकीगत ऐकून घेऊन तिला त्यांनी आपल्या आश्रमांत नेलें. सीता त्यावेळी गरोदर होती, ती प्रसूत होऊन तिला दोन आवळेजावळे पुत्र झाले. त्यांचे लालनपालन वाल्मीकि ऋषींनीं केलें. स्वतःच्या कुलाबद्दल वगैरे कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी त्या पुत्रांस लागू दिली नव्हती. त्यानंतर वाल्मीकि ऋषींनीं रामायण लिहिले व त्यावरून एक नाटकही लिहिलें.
 नाट्य आणि संगीत या कला हिंदुस्थानांत फार पवित्र मानल्या जातात. संगीत हा पांचवा वेदच होय अशी ह्मण हिंदुस्थानांत आहे. एखादें प्रीतीचे अथवा दुसरे कसलेही गाणे असो, ते गात असतां गायक जर त्याशीं तल्लीन होऊन गेला तर त्याला मोक्ष मिळतो. त्याला जपतपादि दुसरी साधनें कोणतच नकोत. ध्यानादि साधनांनी जे कांहीं मिळवावयाचें तें तो गाण्याने मिळवितो असा आमचा समज आहे.
 वाल्मीकि ऋषींनीं रामचरिताचे वर्णन तयार करून ते रामाच्या पुत्रांना शिकविलें.
 मोठमोठ्या राजांनी अनेक प्रकारचे यज्ञ करण्याची चाल हिंदुस्थानांत पूर्वकाली होती. त्या चालीला अनुसरून रामानेंहीं एक यज्ञ करण्याची तयारी केली. पण पत्नीशिवाय कोणताही यज्ञ सांग होऊ शकत नाहीं. पत्नीला सहधर्मचारिणी असें ह्मणतात. हिंदूंच्या गृहस्थाश्रमधर्माप्रमाणे प्रत्येकाला कित्येक यज्ञ करावे लागतात; परंतु ते सहधर्मचारिणीशिवाय पूर्ण व सशास्त्र होऊ शकत नाहींत.
 रामानें यज्ञ आरंभिला त्यावेळी त्याची पत्नी सीता त्याजपाशी नव्हती. तेव्हां रामाने पुन्हा लग्न करावे अशी सूचना त्याला कोणी केली. पण राम एकपत्नीव्रती होता. तो ह्मणाला, सीतेवांचून अन्य स्त्रीची योजना पत्नीच्या ठिकाणीं मी करणार नाहीं. मग सीतेची एक सुवर्णप्रतिमा करून तिची
 स्वा. वि. खं. ३-४,