पान:विवेकानंद.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


 त्यावेळीं वानरांचा एक राजा वाली या नांवाचा होता. त्याचे व त्याचा भाऊ सुग्रीव याचे राज्याच्या बाबतींत युद्ध सुरू झाले होते. रामाने सुग्रीवाचा पक्ष स्वीकारून त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. सुग्रीवाचे राज्य वालीने बळकाविले होते व त्याला हद्दपार केले होते. उलटपक्षीं सुग्रीवानें रामाला मदत करावी असे ठरले. या सर्वांच्या मदतीने सीतेचा शोध रामानें सर्वत्र केला; पण त्यास कोठेहि थांग लागला नाही. शेवटी हनुमानाने एकाच उडाणाने समुद्र उल्लंघून तो लंका बेटांत गेला, आणि तेथे सीतेच्या शोधासाठी हिंदूं लागला; पण त्याला तेथेही सीतेचा शोध लागला नाहीं.
 लंकेचा राजा रावण हा फार बलाढ्य होता. त्याने सर्व देवांना व दानवांना जिंकून आपल्या बंदिशाळेत घातले होते; आणि शेंकडों रूपवती स्त्रिया धरून आणून त्यांस त्याने भोगपत्न्या केल्या होत्या. त्यांच्या राहावयाच्या महालांतून हनुमान हिंडला. शेवटी त्याला विचार सुचला कीं, सीता येथे असणे शक्य नाहीं. अशा जाग्यांत येऊन पडण्यापूर्वी सीता प्राणत्याग करील. मग ती जागा सोडून देऊन हनुमान दुसरीकडे गेला. शेवटीं अशोकवनांत एका वृक्षाखाली सीता बसली असल्याचे त्याला दिसले. ती अत्यंत कृश झाली असून शोकसागरांत बुडाली होती. क्षितिजावर उगवलेल्या द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे तिच्या लावण्याची अंशमात्र कला शिल्लक राहिली होती. हनुमानाने अत्यंत सूक्ष्म रूप धारण केले आणि त्याच वृक्षावर तो बसून राहिला. मग कित्येक राक्षसिणी येऊन सीतेचे मन वळविण्याचा यत्न करू लागल्या; पण तिने नुसते वरसुद्धा पाहिलें नाहीं.
 त्या राक्षसी निघून गेल्यानंतर हनुमान झाडावरून खाली उतरला व सीतेजवळ येऊन ह्मणाला, “मी रामाचा दूत असून त्यानेच मला आपला शोध करण्यासाठी इकडे पाठविले आहे." असें ह्मणून बरोबर आणलेली आंगठी त्याने तिला दाखविली. तो आणखी ह्मणाला, “आपण कोठे आहां याची बरोबर माहिती रामाला मिळाली ह्मणजे मोठे सैन्य घेऊन राम येईल व रावणास जिंकून आपणास सोडवून नेईल; तथापि आपली मर्जी असेल तर आपण माझ्या खांद्यावर बसावें, ह्मणजे एकाच उडत समुद्र उल्लंघून आपणास रामाकडे नेईन." पण सीतेने या ह्मणण्यास रुकार दिला नाहीं; कारण ती निःसीम पतिव्रता होती. परक्या पुरुषाचा नुसता स्पर्शही तिला