पान:विवेकानंद.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
रामायण.

४५


राणी होण्याचे कबूल करीपर्यंत तिला निवायाच्या जागी आणू नये असा त्याने सक्त हुकूम सोडला.
 इकडे राम व लक्ष्मण पर्णकुटिकेंत परत येऊन पाहतात, तों सीता तेथे नाही. यामुळे दोघेही अत्यंत शोकाकुल झाले. सीतेचे काय झाले असावे याचा तर्क कोणालाच कांहीं करता येईना. दोघेही झोंपडीतून बाहेर पडून अरण्यांत तिचा शोध करीत फिरू लागले; पण तिचा मागमूसही त्यांस कोठे लागला नाहीं. फिरता फिरतां त्यांना एका ठिकाणीं कांहीं वानर आढळले. त्यांत हनुमान् नांवाचा एक श्रेष्ठ वानर होता. हनुमान् हा दैवी प्रकृतीचा वानर असून तो तेथील वानरांचा अधिपति होता. सीतेला मुक्त करण्याच्या कार्यात यानेच रामाला मोठी मदत केली. रामाच्या ठिकाणी त्याची निष्ठा इतकी प्रबल होती की खरा भक्त कसा असावा याचे उदाहरण ह्मणून हनुमानाचे नांव लोक घेऊ लागले. परमेश्वराचा एकांतिक भक्त ह्मणून मारुतीची पूजा हिंदुस्थानांत आजतागाईत सर्वत्र होत आहे. वानर, राक्षस इत्यादि अनेक प्रकारच्या रानटी जाती त्या काळीं हिंदुस्थानांत राहत होत्या. दक्षिण हिंदुस्थानांतील अरण्यांत हे लोक टोळ्याटोळ्यांनीं राहत असत.
 रामाला या वानरांपैकी एक टोळी भेटली. आकाशमार्गे एक रथ गेला असल्याचे आपण पाहिलें, व त्या रथांत एक राक्षस आणि एक अत्यंत रूपवती स्त्री असून, ती शोकाकुल झाली होती असे त्यांनी रामाला सांगितले. ते ह्मणाले, “रथ इकडून गेला त्यावेळी तिने एक दागिना खाली टाकला आहे, तो हा पहा." असे ह्मणून त्यांनी एक कंठाभरण रामाला दाखविले. लक्ष्मणाने ते हातांत घेऊन ह्मटले, “मला हा दागिना ओळखवत नाहीं. रामानें तो दागिना ओळखून ह्मटले, “होय, खरोखर हा सीतेचाच अलंकार आहे." सीता ही लक्ष्मणाच्या वडील भावाची बायको असल्यामुळे आर्यपद्धतीप्रमाणे तिच्याकडे पाहणे ह्मणजे मोठे पाप आहे असे लक्ष्मणास वाटत होते. याच मुळे तिचा अलंकार त्याला ओळखता आला नाही. कारण तो अलंकार गळ्यांत घालण्याचा होता. आयच्या प्राचीन पद्धतीचा हा एक मासला आहे. नंतर त्या वानरांनीं तो राक्षस कोण व कोठला राहणारा याजबद्दल सर्व माहिती रामाला सांगितली; आणि ते सर्व मिळून त्याच्या शोधाकरितां निघाले.