पान:विवेकानंद.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


"आज कांहीं तरी संकट येणार असे मला वाटत आहे. यासाठी या वर्तुळाबाहेर न येण्याची खबरदारी घ्या. याच्या बाहेर तुम्ही आल्यास तुमच्यावर काय प्रसंग ओढवेल ते सांगवत नाहीं.” इकडे रामाचा बाण त्या हरिणास लागतांच त्याचा एकदम राक्षस होऊन तो मरून पडला.
 त्याचवेळी “लक्ष्मणा धांव' असा करुणस्वर झोंपडीत बसलेल्या सीतेला ऐकू आला. तो ऐकून सीता फार घाबरून गेली आणि लक्ष्मणाला म्हणाली, ** भावोजी, हा त्यांचाच शब्द आहे. आपण लवकर त्यांच्या मदतीला जा." लक्ष्मणाने उत्तर दिले, “हा रामाचा स्वर खचित नाहीं." पण सीतेने फार विनविल्यामुळे लक्ष्मणाला वनांत जावे लागले. लक्ष्मण फार दूर जातो न जातो तोंच रावण भिका-याच्या रूपाने झोंपडीजवळ आला व कांहीं दान करण्याबद्दल सीतेची विनवणी करू लागला. सीता म्हणाली, “ थोडा वेळ थांब. घरांतील पुरुष बाहेर गेले आहेत; ते आले म्हणजे तुला भिक्षा घालीन." भिकारी म्हणाला, “मला इतकी भूक लागली आहे की आतां माझ्याने दम धरवत नाहीं. तुमच्याजवळ जे काय असेल तेवढेच मला पुरे.” त्यावेळी थोडी रानफळे मात्र सीतेजवळ शिल्लक होती. ती फळे सीता त्यास देऊ लागली तेव्हां तो म्हणाला, “बाई, आणखी अलीकडे येऊन मला दान करा; माझ्याजवळ येण्यास तुह्मीं अनमान करू नका; मी साधू आहे. त्याला ती फळे देण्याकरितां सीतेला त्या अग्नीच्या वर्तुळाबाहेर यावे लागले. ती बाहेर येतांक्षणींच भिका-यानें आपलें विशाळ राक्षसीरूप प्रकट केले आणि सीतेला उचलून त्याने आपल्या रथांत घातलें व झपाट्याने तो तेथून निघून गेला. गरीब बिचारी सीता ! त्यावेळी तिच्या मदतीला कोणीच नव्हते. रावण घेऊन जात असतां तिने आपल्या अंगावरील अलंकार काढून वाटेंत ठिकठिकाणी टाकून दिले.
 सीतेला घेऊन रावण निघाला तो थेट लंकेंत आला; आणि आपणास वरण्याबद्दल सीतेची मनधरणी करू लागला. त्याने अनेक प्रकारे तिची समजूत घालण्याचा व वस्त्राभरणांनी तिला मोह पाडण्याचा यत्न केला. परंतु सीतादेवी पातिव्रत्याची केवळ मूर्तीच होती. तिने रावणाबरोबर भाषणसुद्धा केलें नाहीं अथवा त्याजकडे पाहिलेही नाही. अशा प्रकारच्या तिच्या वर्तनानें रावणास क्रोध येऊन त्याने तिला एका वृक्षाखाली नेऊन ठेवले आणि आपली