पान:विवेकानंद.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
रामायण.

४३


 राम, लक्ष्मण आणि सीता ही ज्या वनांत गेली, त्यांत वानर आणि राक्षस यांची बरीच मोठी वस्ती होती. सीता रामाबरोबर जावयास निघाली तेव्हां राम तिला म्हणाला, “ तू सुखांत वाढलेली राजकुमारी; भीतीने युक्त असा अरण्यवास तुला कसा करता येईल ?" सीतेने उत्तर दिलें, “जेथे राम तेथे सीता. आता माझे राजकुमारीपण नष्ट झाले आहे. आतां जी स्थिति आपली तीच माझी." रामालाही मग तिचे मन मोडवलें नाहीं; व सीता त्याजबरोबर अरण्यांत गेली. याप्रमाणे सीता, राम आणि लक्ष्मण अशी तिघे अरण्यांत शिरली व यमुना नदीच्या किनाच्यापर्यंत गेली. यमुनातटाकी एक पर्णकुटिका बांधून त्यांत त्यांनी वस्ती केली. रानांतील फळे जमा करून व हरणे वगैरे वनपश्रुंची शिकार करून ती आपला उदरनिर्वाह करू लागली. अशा रीतीनें कित्येक दिवस लोटल्यानंतर एक राक्षसी त्या ठिकाणी आली. लंकेचा राजा रावण याची ती बहीण होती. सांप्रतच्या सिलोन बेटाला त्यावेळी लंका असे नांव होते. रावणाची बहीण त्या अरण्यांत इकडेतिकडे फिरत असतां सहजगत्या राम तिच्या नजरेस पडला. त्याचे ते मदनाला लाजविणारे रूप पाहून ती अगदी मोहित झाली; परंतु राम हा अत्यंत पवित्र वर्तनाचा व एकपत्नीव्रत पाळणारा असल्यामुळे तिच्याकडे त्याने मुळीच लक्ष्य दिलें नाहीं. हा अपमान तिला सहन न होऊन ती आपल्या बंधूकडे गेली आणि त्याजपाशीं तिने सीतेच्या अलौकिक स्वरूपाचे वर्णन केले.
 राम हा अत्यंत शूर म्हणून प्रसिद्ध होता. त्यावेळच्या राक्षसांपैकी कोणीही त्यास जिंकण्यास समर्थ नव्हता. रावणालाही या गोष्टीची माहिती होती. याकरितां रामाला जिंकून सीता मिळविणे शक्य नव्हते; म्हणून कांहीं युक्ति योजून सीतेला हस्तगत करण्याचा त्याने बेत केला. त्याने दुसरा एक राक्षस आपल्या मदतीस घेतला. हा राक्षस मायावी विद्येत फार प्रवीण होता. त्याने सुंदर हरिणाचे रूप धारण केले आणि रामाच्या पर्णकुटिकेजवळ जाऊन तो त्या रूपाने इकडेतिकडे बागडू लागला. त्या हरिणाचें तें मनोहर रूप पाहून सीतेला फार हर्ष झाला, आणि त्याला धरून आणण्यासाठी तिने रामाची विनवणी केली. त्यास धरण्याकरितां रामही ताबडतोब त्याच्या पाठीमागे गेला. जातांना त्याने लक्ष्मणास सीतेच्या संरक्षणाकरितां म्हणून मागे ठेविलें. लक्ष्मणाने झोंपडीभोंवतीं अग्नीचे एक वर्तुळ तयार केले आणि सीतेला म्हटले,