पान:विवेकानंद.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
[तृतीय
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

___________________________________________________________________________________

त्यांच्याने ते धनुष्य भंगवलें नाहीं. शेवटीं रामाने ते धनुष्य उचलले आणि सहज लीलेने मोडून टाकिलें. नंतर दशरथपुत्र राम व सीता यांचा विवाहसमारंभ मोठ्या आनंदाने साजरा करण्यांत आला. आपल्या पत्नीला घेऊन राम राजधानीस परत आल्यानंतर त्याला यौवराज्याचा अभिषेक करण्याची तयारी दशरथ राजाने केली. समारंभाची कडेकोट तयारी केली होती आणि सर्वत्र आनंदीआनंद पसरला होता. इतक्यांत रामाची सापत्न माता कैकेयी हिने त्या सा-या आनंदांत विरजण घातले. पूर्वी एके वेळीं राजा दशरथाने तिला दोन वर देऊ केले होते; पण तिने त्यावेळी ते मागून घेतले नाहींत. तिला त्या वरांचे स्मरणही राहिले नव्हते; पण तिच्या एका दासीने ते स्मरण तिला यावेळी करून दिले, आणि ते वर मागून घेण्याबद्दल सुचविलें. ती दासी अत्यंत दुष्ट स्वभावाची होती. कैकेयीचा भरत नांवाचा पुत्र होता, त्याला यावेळी यौवराज्याभिषेक करून घेण्याबद्दल तिनें कैकेयीचे मन वळविले. तिने नानाप्रकारच्या गोष्टी कैकेयीस सांगून तिच्या मनांत भयंकर मत्सर उभा केला. मत्सराग्नीने ती नुसती जळू लागली. तिची इतकी स्थिति झाल्यानंतर, एका वराने भरतास यौवराज्याभिषेक व दुस-याने रामाला चौदा वर्षे वनवास मागून घे असे त्या दासीने तिला सांगितले.
 राम हा दशरथ राजाचा अगदी जीव की प्राण होता. कैकेयीचे मागणे त्याच्या कानावर पडल्याबरोबर वज्राघात झाल्याप्रमाणे त्याची स्थिति झाली. वचनभंग करण्याची छाती त्याला होईना आणि रामालाही त्याला दूर करवेना. एकीकडे आड आणि एकीकडे विहीर अशी त्याची स्थिति झाली. पण या स्थितींतून रामाने त्याची मुक्तता केली. राम स्वतःच वनवासास जाण्यास तयार झाला. पित्यानं वचनभंग करावा यापेक्षा आपणच वनवास पत्करावा हें बरें असा निश्चय करून तो वनवासास गेला. त्यावेळी त्याची पत्नी सीता व धाकटा भाऊ लक्ष्मण हीही त्याजबरोबर गेली.
 या वेळी आर्यावर्तातील भयंकर अरण्यांतून अनेक जातींचे मूळचे रानटी लोक राहत असत. त्यांजबद्दल आर्यास फारशी माहिती नसे. याच रानटी लोकांपैकी एका जातीस त्यांनी वानर असे नांव दिले होते. त्याचप्रमाणे या जातींपैकी जी एक अत्यंत बलाढ्य जात होती, तिला त्यांनी राक्षस असें नांव दिले होते.