पान:विवेकानंद.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
४१
रामायण.

 प्राप्तीसाठी अनेक उपाय केले. पुढे त्याला चार पुत्र झाले. त्यांत राम हा सर्वांत वडील होता. पूर्वपद्धतीप्रमाणे राजाने आपल्या चारी पुत्रांस सर्व प्रकारच्या विद्येत व कलांत तरबेज केले. आपल्या पाठीमागे राज्याबद्दल आपल्या पुत्रांत तंटेभांडणें उपस्थित होऊ नयेत म्हणून राजे लोक आपल्या देखतच वडीलपुत्रास राज्याभिषेक करीत असत. हा अभिषेक झाल्यानंतर त्या पुत्रास युवराज म्हणजे तरुण राजा अशी पदवी प्राप्त होई. या चालीप्रमाणे दशरथ राजाने आपल्या वडील पुत्रास यौवराज्य देण्याची तयारी केली.
  त्याचवेळी आर्यावर्तांत जनक नांवाचा दुसरा एक राजा होता. त्याला सीता या नांवाची एक अत्यंत लावण्यवती कन्या होती. सीतेची उत्पत्ति पृथ्वीपासून झाली होती. जमीन नांगरते वेळीं जो तास पडतो त्याला जुन्या संस्कृत भाषेत सीता असे नांव आहे. उत्पत्तीचे नानाप्रकार जुन्या दंतकथांतून वर्णिल्याचे आढळून येते. कोणा एखाद्याची उत्पत्ति केवळ पुरुषापासून होत असे; एखाद्याची मानवी आईबापांवांचून होत असे. कोणा एखाद्याचा जन्म यज्ञांतील अग्नीपासून झाल्याचे वर्णन आढळते. तसेच आणखी एखादा मेघांतून अवतरला असेंही वर्णन आहे. भारतीय पुराणग्रंथांतून अशा प्रकारच्या अनेक कथा गोंवल्या असल्याचे तुम्हांस आढळून येईल. सीता ही पृथ्वीची कन्या असल्यामुळे अत्यंत पवित्र होती. तिला जनक राजाने वाढविले होते. ती उपवर झाली तेव्हां जनक राजाने तिच्या विवाहाची तयारी केली.
 हिंदुस्थानांत पूर्वी स्वयंवराची चाल होती. स्वयंवराचे वेळीं देशोदेशीचे राजे व राजपुत्र येत असत आणि कन्या त्यांपैकी एखादा पसंत करीत असे. हातांत पुष्पमाला घेऊन राजकन्या सभामंडपांत फिरत असे व तिजबरोबर तिची सखी असून ती तिला प्रत्येक राजाबद्दल माहिती सांगत असे. राजकन्येस एखादा वर पसंत पडला म्हणजे तिने आपल्या हातांतील माळ त्याच्या गळ्यांत घालावयाची व नंतर विवाहसमारंभ मोठ्या थाटाने व्हावयाचा अशी चाल असे.
 सीतेला वरण्यास पुष्कळ राजकुमार अत्यंत उत्सुक झाले होते. सभा भरल्यावर तेथे हरधनु नांवाचे एक प्रचंड धनुष्य आणून ठेवलें; आणि जे कोणी ते धनुष्य मोडील त्यालाच सीता वरील असा पण लाविला. पुष्कळ राजपुत्रांनीं तें धनुष्य मोडण्यासाठी आपली सर्व शक्ति खर्च केली; पण