पान:विवेकानंद.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

पूर्वीचा वाटमाच्या नष्ट होऊन त्या जागी आतां वारुळांतून-वल्मीकांतून-एक नवा सिद्ध जन्मास आला आहे; याकरिता यापुढे तू वाल्मिकि या नांवाने प्रसिद्धीस येशील." अशा रीतीने वाटमान्याचा ऋषि झाला.
  या ऋषीला कवित्व प्राप्त झाल्याची हकीगतहि फार मनोरंजक आहे. एके दिवशी हे ऋषि स्नानाकरितां गंगानदीवर जात असतां वाटेंत क्रीडा करीत असलेले क्रौंच पक्ष्याचे एक जोडपे त्यांच्या नजरेस पडले. ते जोडपें क्रीडा करीत व एकमेकांचे चुंबन घेत होते. त्या जोडप्याकडे पाहून ऋषिवर्यास फार आनंद झाला. इतक्यांत एक बाण सूसू करीत आला व नराच्या हृदयांत शिरून त्याने त्याचा प्राण घेतला. नर मरून खाली पडल्याबरोबर मादी त्याच्या शरिराभोंवतीं गरगर फिरून दुःखित होत्साती तारस्वराने आक्रंदन करू लागली. हा देखावा पाहून ऋषींचे मृदु अंतःकरण एकदम पाझरले. त्यांनी बाजूला वळून पाहिलें तो एक निषाद त्यांच्या नजरेस पडला. त्याला पाहताक्षणीच ते एकदम बोलू लागले,“मा निषाद प्रतिष्ठा त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम् । भाषण संपल्यावर ऋषि आपल्याच मनाशीं त्याबद्दल विचार करू लागले; “अशा प्रकारचे भाषण मीं पूर्वी कधीही केलेले नसतां आजच असे कसे झाले? माझ्या भाषेत ही विशिष्ट रचना कोठून आली ?” अशा प्रकारचे विचार त्यांच्या चित्तांत सुरू आहेत तोंच ती पूर्वीची वाणी पुन्हां बोलू लागली. * भिऊ नको. तुला कवित्व प्राप्त झाले आहे. तू बोललास ती छंदोबद्ध कविता आहे. आतां श्रीरामचरिताचें कविताबद्ध वर्णन कर. ते साच्या जगाला उपकारक होईल.” संस्कृत भाषेत कविता प्रथम निर्माण झाल्याची हकीगत अशी आहे. कविता प्रथम जन्मास आली ती सकरुण अंतःकरणांतून आली. वाल्मिकि ऋषि हे संस्कृत कवितेचे जनक होत. यानंतर त्यांनी रामचरिताचें कविताबद्ध वर्णन केले आणि तेच पुढे रामायण या नावाने प्रसिद्धीस आले. ती रामायण कथा आतां थोडक्यात सांगतो.
  पूर्वकालीं अयोध्या नांवाची एक नगरी होती. सांप्रतही हे शहर अस्तित्वांत असून याच नावाने प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानच्या इंग्रजी नकाशांत Oudh म्हणून जो प्रांत दाखविला आहे त्यांत हे शहर आहे. या शहरी एकेकाळी दशरथ नांवाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाला तीन राण्या होत्या; पण त्याला संतान नव्हते. आमच्या पूर्वापर पद्धतीस अनुसरून राजानें पुत्र-