पान:विवेकानंद.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

३५

तहि कोठे नाहीं असे तुह्मी निश्चयाने समजा. अंतःसृष्टीचा अभ्यास वाढत चालला तसतशा या गोष्टी त्यांच्या लक्ष्यात येऊ लागल्या. बाह्यसृष्टि ही अंतःसृष्टीचें अस्पष्ट असे परावर्तन आहे, ही गोष्ट त्यांनी यापुढे सिद्ध केली. विश्वबाह्य परमेश्वराच्या कल्पनेपासून आरंभ करून तो ईश्वर स्वतःच्या अंतगंत भांडारांतच आहे, येथपर्यंतचा शोध त्यांनी क्रमाक्रमाने लाविला. सृष्टीच्या बाहेर राहणा-या परमेश्वरास त्यांनी स्वतःच्या हृदयांतच राहावयास जागा दिली ! या ठिकाणी सर्व आत्म्यांचा परमात्मा आणि आमच्यांतील सत्यस्वरूप असा तोच आहे हे त्यांनी सिद्ध केलें.
 आर्यांच्या वेदान्ततत्त्वज्ञानाचे निरनिराळे भाग यथोचित रीतीने लक्ष्यांत आणावयाचे असले तर त्याकरितां आरंभापासून सर्व सिद्धांतांचा मन:पूर्वक अभ्यासच केला पाहिजे. ते केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, ही गोष्ट प्रथम लक्ष्यांत बाळगली पाहिजे. वेदान्त म्हणजे एखाद्या विशिष्ट तत्त्वज्ञानपंथाचे पुस्तक असा अर्थ नाही. पाश्चात्य पंडित क्यांट अथवा हेगेल यांनी जशी स्वतःचीं मते प्रतिपादून आपल्या तत्त्वज्ञानाचे ग्रंथ तयार केले, तशी वेदान्ततत्त्वज्ञानाची गोष्ट नाहीं हें आरंभींच ध्यानात ठेवले पाहिजे. निरनिराळ्या काळी अनेकांनी अनेक ग्रंथ लिहून वेदान्ततत्त्वज्ञानास सांप्रतचे स्वरूप आणिलें आहे. कित्येक वेळां एखाद्या ग्रंथांत पांचपन्नास निरनिराळ्या गोष्टी एकत्र केल्या असल्याचे तुम्हांस आढळेल. त्यांत कांहीं विशेष प्रकारचा व्यवस्थितपणा असल्याचे दिसणार नाही. यदृच्छेनें उद्भवणाच्या विचारांचे ते एक टांचण असल्यासारखे दिसेल. कित्येकवेळां अनेक प्रकारच्या गैरलागू अशा विचारांच्या गर्दीत एखादें बिनमोल तत्त्वरत्न आढळून येईल. उपनिषद् ग्रंथांचा अभ्यास करीत असता एक गोष्ट मात्र विशेषेकरून आपल्या लक्ष्यांत आल्यावांचून राहणार नाहीं. ती ही कीं, उपनिषदांतील सर्व कल्पना एकामागून एक वाढत्या दर्जाच्या आहेत. आर्यतत्त्वज्ञांच्या मानसिक वाढीचा उपनिषदें हा एक नकाशाच आहे. मानसिक अवस्था ज्या क्रमाने बदलत गेल्या, त्याच क्रमानें त्या नमूद केल्या गेल्या आहेत. आरंभीं अगदी असंशोधित कल्पना आढळून येतात. यानंतर त्या चाळल्या जाऊन त्यांचे जसजसे संशोधन होत गेले, तसतशा एकाहून एक वरचढ अशा कल्पनांची मालिका आढळून येते. आणि सर्वांच्या शेवटीं वेदान्त-- तत्त्वरत्नें सांपडतात. येथेंच या सर्व तत्त्वज्ञानपरंपरेला वेदान्त अशी शास्त्रीय