पान:विवेकानंद.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

धर्मविजयाचे एक नवेंच तोरण बांधले गेले. आमच्या धर्मवीरांनी ही एक मोठ्याच मान्याची जागा सर केली असे म्हणावयाला हरकत नाहीं. ही जागा त्यांनी कशी सर केली आणि या ठिकाणावरून पुढे चाल करून मायेचें नवें राज्य त्यांनी कसे उभारिलें, हा इतिहास अत्यंत ज्ञानप्रद आहे. माया आणि तिच्या स्वरूपाची उपपत्ति हा वेदान्तदुर्गातील मुख्य बुरूज होय. सत्य तुमच्यापाशीच आहे-किंबहुना तुम्हीच सत्यस्वरूप आहां-पण मायेच्या पडद्यामुळे सत्यावर आवरण पडले होते. हा वेदांताचा अंतिम सिद्धांतही याच वेळेनंतर सिद्ध होण्याच्या मार्गास लागला.
  या काळानंतर आमच्या प्राचीन आयचे मन या नव्या उपपत्तीच्या शोधांत' गुंतलें. बाह्य जगांत भटकून आणि बाह्य विधींच्या मागे लागून आपल्या प्रश्नास समाधानकारक उत्तर मिळणे शक्य नाही, ही गोष्ट त्यांस पूर्णपणे कळून चुकली. बाह्यसृष्टींत भटकण्यांत युगानुयुगें खर्च केली तरी त्याचा उपयोग यत्किचितहि होणार नाही अशी त्यांची खात्री झाली. अशी खात्री झाल्यामुळे ते अर्थातच निराळ्या दिशेनें शोध करू लागले. अंतःसृष्टीचा अभ्यास करीत असतां त्यांस असे समजलें कीं इंद्रियजन्य सुखाची लालसा ही सत्याला आवरणरूप होऊन बसते; आणि यामुळे आम्हांस सत्यदर्शन होत नाहीं. यज्ञयाग अथवा बाह्योपचारयुक्त पूजाविधि हे आवरण दूर करण्याचे मार्ग नव्हत अशीही त्यांची खात्री झाली. स्वतःच्या मनःशक्तीचा अभ्यास करून तिचे पृथक्करण करण्याचा व त्याच्या द्वारे स्वतःपाशींच सत्य शोधण्याचा अभ्यास त्यांनी केला. वेदान्ततत्त्वज्ञानाच्या उद्याचा काल हाच होय. अंतःसृष्टीचा अभ्यास हेच वेदान्ताचे प्रमुख अंग आहे. यानंतर हा शोध केवळ अंतःसृष्टिद्वारा चालू असल्याचे आपणांस आढळून येते. एखाद्या विशिष्ट धर्ममार्गात अथवा मतांत सत्य गुरफटून राहिलेले नसून त्याचा शोध तुह्मांस तुमच्या अंतरंगांतच लागेल असे ते आरंभापासूनच ह्मणू लागले. बाह्यसृष्टींतील कोणत्याहि चमत्काराहून अत्यंत मोठा चमत्कार ह्मणजे तुमचा आत्माच होय. सर्व ज्ञानाचे आदिभांडार तुमचा आत्माच आहे. जगांत सत् ह्मणून जें कांहीं आहे, ज्यावर सर्व विश्वाचे अस्तित्व अवलंबून आहे, ते तुह्मांपाशींच आहे. त्याचा शोध तुह्मांस तुमच्या स्वतःच्या जवळच लागेल असे आर्यतत्त्ववेत्ते सांगू लागले. यांत जिचा शोध लागणार नाहीं, ती वस्तु त्रैलोक्यां