पान:विवेकानंद.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३३

खंड.]

श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

आर्यऋषि अंतःसृष्टीच्या शोधांत गुंतून धर्माची वाढ करीत असतां दुस-या बाजूने बाह्य विधींचे भले मोठे रान माजत चालले होते. हे रान शेवट इतकें वाढले की त्यांतील हवा कोंडून हिंदु लोकांच्या जीवितासहि धोका येण्याजोगी परिस्थिति उत्पन्न होण्याच्या मार्गास लागली. हे बाह्य विधी आम्हां हिंदु लोकांच्या हाडमासी इतके खिळून गेले आहेत की, त्यांजमुळे आम्हांभोंवतीं कांहीं बंधने उपजतच बांधली जाऊन आम्ही जन्मापासून गुलाम बनत; पण असे असले तरी या विधींस फांटा देण्यासाठी कंबर बांधून सज्ज झालेला असाही एक पक्ष आरंभापासूनच दृष्टीस पडतो. अमक्या वेळींच आणि अमक्या प्रकारेंच जेवावें, अमक्याच प्रकारचा पोषाक करावा अथवा अमक्याच प्रकारे ईश्वरपूजन करावे इत्यादि बाह्य विधींच्या योगाने केवळ जडपदार्थांबद्दलची आवड मात्र दिसून येते. इंद्रियतृप्ति हाच ज्यांना मोक्ष वाटतो त्यांना हे बाह्य विधी पुरेसे वाटतात. इंद्रिये सोडून पलीकडील प्रदेशांत भराच्या मारण्याची ज्यांस इच्छा आहे त्यांना हे बाह्य विधी शृंखलांसारखे वाटतात. बाह्य विधींची आवड ही इंद्रियसुखाच्या आवडीची द्योतक आहे, हाच आक्षेप बाह्य विधींविरुद्ध प्रथम पुढे करण्यांत आल्याचे आढळून येते. वास्तविक विचार केला तर आम्हां मनुष्यांची उडी इंद्रियजन्य सुखापलीकडे फारशी कधीं जातच नाही. आमच्या संस्कृतीच्या आड येणारा हा मोठाच दोष आपणां मनुष्यांत आहे. धर्मज्ञानाची किंमत जोखण्याचा आपला कांटासुद्धां इंद्रियें हाच आहे. धर्म, ईश्वर आणि तत्त्वज्ञान यांजबद्दल कित्येक दिवस गोष्टी ऐकाव्या आणि शेवटीं म्हणावें “काय हो, हें। शिकल्यापासून मला अधिक पैसे मिळू लागतील काय? माझ्या सुखाची वृद्धि होईल काय? माझा अमुक रोग जाईल काय ?' असे कित्येक लोक तुमच्या पाहण्यांत नेहमी येत असतील. ज्या मनुष्याला इंद्रियजन्य सुखाच्या पलीकडे दुसरी कल्पनाही कधी उद्भवली नाहीं त्याला असे वाटावें हें रास्तच आहे. मनुध्याच्या ठिकाणीं सामान्यपणे आढळून येणा-या या लालसेवरून आमच्या ऋषींनी एक नवा सिद्धांत शोधून काढला आहे. इंद्रियजन्य सुखाची तृप्ति हेच आमच्या अज्ञानाचे कारण आहे असा त्यांचा सिद्धांत आहे. सत्य आणि आम्ही यांची भेट न होण्यास हाच पडदा मध्ये आड पडला आहे. बाह्य विधींची आवड आणि तद् द्वारा इंद्रियांची तृप्ति यांमुळे सत्याच्या आड एक पडदा उत्पन्न होऊन ते आम्हांस दिसेनासे होते. या सिद्धांताची स्थापना, हे

स्वा. वि. खं. ३- ३.