पान:विवेकानंद.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

शेवटी आहे. ही भाषासुद्धा अत्यंत काव्यमय आहे; पण यांतील काव्यरसाचा विचार बाजूला ठेवला तर विश्वाचे कोडे बहुतांशी उकलण्याच्या स्वरूपाला यावेळीं आलें होते असे आढळून येईल. मंत्रद्रष्ट्या ऋषींची मने यावेळी किती परिणतावस्थेस पोहोंचली होती ते येथे उघडपणे कळण्याजोगे आहे. सामान्य मनुष्यांचे समाधान जशा प्रकारच्या उत्तरांनीं होते, तशा प्रकारच्या उत्तरांनी या ऋषींचे समाधान झाले नाही तेच बरोबर आहे असे उघड दिसते. यापूर्वी एक एक देवता घेऊन तिचे अधिष्ठान सर्वत्र आहे, ती सर्वव्यापी आहे असे ते ह्मणत होते; पण या एकेश्वरी कल्पनेने त्यांच्या चित्ताचे समाधान झाले नाही. यानंतर एखादी कल्पना घेऊन तिचा शक्य तितका विस्तार करावयाचा अशा प्रकारच्या पद्धतीचा स्वीकार त्यांनी केला. एखादी विशिष्ट कल्पना प्रथम घेऊन ती सर्वांचे अधिष्ठान आहे, इतकेच नव्हे, तर ती कल्पनाच स्वतः विश्वरूप झाली आहे असे ते ह्मणू लागले. प्राण हाच सर्वाचे अधिष्ठान असून एकंदर विश्वांत जेथे जेथे हालचाल दिसते तेथे तेथे प्राण व्यक्त झाला आहे असे ते ह्मणू लागले. प्राण हा केवळ मनुष्याच्या शरिरांतच असतो असें नाहीं; तर त्याची व्याप्ति सूर्य आणि चंद्र यांतही असून एकंदर विश्वाची मूळ चालकशक्ति प्राणच आहे असा त्यांनी निश्चय केला. यावेळी जे मंत्र, रचिले गेले आहेत ते अत्यंत काव्यमय आणि चित्तास तल्लीन करून सोडणारे आहेत. एखाद्या वस्तूची कल्पना इतकी सुंदर रीतीने व्यक्त झाली आहे की ती वस्तु जणुंकाय आपल्यासमोरच आहे असे वाटते. यानंतर 'इच्छा' ही कल्पना उदय पावली; आणि तिचा विस्तारंही पूर्वीच्या कल्पनांप्रमाणेच वाढत जाऊन ती विश्वव्यापी झाली; तथापि या कल्पनेनेही ऋषींचे समाधान झाले नाही, आणि सत्याचा शोध पुढे चालू झाला.
 यानंतर या इच्छेसच मुख्य पद देण्यांत येऊन तीच सर्वांचे अधिष्ठान आहे, तिच्यांतच सर्वं विश्व राहते, तिजमुळेच हे जीवात्मे उत्पन्न झाले, तीच सर्व शक्ति देणारी आहे, तिचेच पूजन सर्व देवता करतात, जीवित आणि मृत्यु या तिच्याच छाया आहेत, तिचेच स्तोत्र हिमालयाची हिमधवल शिखरे गात असतात आणि समुद्र आपल्या सकल जलाशयाने तिचाच जयजयकार करतो. अशा प्रकारचे तिचे वर्णन केले आहे; पण या कल्पनेनेही आर्यऋषींचे समाधान झाले नाही, हे अगोदर सांगितलेंच आहे.