पान:विवेकानंद.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

मंत्र आहे, त्यांत हे उत्तर जितक्या सुंदर आणि काव्यमय भाषेने दिले आहे, तितकें तें दुस-या कोठे दिलेले नाहीं.
 "त्यावेळीं कांहीं होते असे नाहीं अथवा नव्हते असेही नाहीं; त्यावेळी हवा, पाणी अथवा दुसरें कांहींच नव्हते. या सर्वांवर आवरण कशाचे होते ? या सर्वांचे आधिष्ठान काय होते ? त्यावेळी मृत्यु नव्हता अथवा मृत्युविरहित अवस्थाही नव्हती; तसेच दिवस नव्हता अथवा रात्रही नव्हती.”

 या उता-यांतील मूळची शोभा भाषांतरांत बहुतांशी नष्ट झाली आहे. मूळच्या संस्कृत भाषेतील शब्दांचे नुसते ध्वनीसुद्धा कर्णमनोहर आहेत. “त्यावेळी सर्वांचे आवरण करणारा परमेश्वराचा श्वास मात्र होता, पण त्याला हालचाल नव्हती. त्यांचे अस्तित्व केवलरूप होते आणि त्याला हालचाल नव्हती" हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आणि विशेषेकरून लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. याच वाक्यांतून आर्यांची विश्वोत्पत्तीची कल्पना पुढे कशी निर्माण झाली आणि हे सारे विश्व ह्मणजे केवळ तरंगरूप आहे असे तत्त्ववेत्त्यांनी कसे सिद्ध केले, हे आपणांस या वाक्यावरून कळण्याजोगें आहे. हा सारा स्पंदसमूह अत्यंत सूक्ष्मरूप धारण करतो व कांहीं काल ही स्थिति टिकून राहते. अगोदर सांगितलेल्या मंत्रांत याच कालाच्या स्थितीचे वर्णन केले आहे. हा तरंगसमूह त्यावेळी अगदीं निष्पंदस्थितीत होता; आणि तो हालचाल करू लागला तेव्हा हे सारे विश्व दृश्यमान् झाले अशी आयांची उपपत्ति आहे. जे कांहीं दिसते अथवा भासमान् होते, त्या प्रत्येकाचे अधि'ष्ठान हा स्पंदसमूह असून याबाहेर असे कांहींच नाहीं; तसेच तो अत्यंत शांत आणि स्वतंत्र आहे अशी आर्यतत्त्वज्ञांची उपपत्ति आहे.
 हिंदुस्थानांत अथवा त्यासारख्या एखाद्या उष्णकटिबंधांतील प्रदेशांत ज्या कोणी प्रवास केला असेल त्याच्या लक्ष्यांत तेथील हवामानासंबंधीं एक विशेष गोष्ट आली असेल. पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास एखाद्या दिवशी दशदिशा प्रथम धुंद होतात. त्यावेळीं कांहीं काळ सर्वत्र अगदी सामसूम होऊन केवळ उदासीनतेचे साम्राज्य पसरतें; झाडे आणि वेली यांचे पल्लवसुद्धा अगदी स्तब्ध-निष्पंद-झालेसे दिसू लागतात; भयंकर उकाडा होऊ लागतो; सर्व सृष्टि उष्णतेने जणु काय शिजत आहे असे वाटते; नंतर थोड्याच वेळाने आकाशाच्या अनंत विस्तारांतील एखाद्या कोंपयांत एखादा लहानसा ढग