पान:विवेकानंद.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

२३

असतों याचा विचार करा. एखाद्या सामान्य चालीरीतीविरुद्ध कांहीं करण्याचा प्रसंग आला तर, आपले कृत्य चांगले असले तरी आपल्या मनाची स्थिति कशी होते हैं लक्ष्यांत आणा; ह्मणजे आमच्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांचे धैर्य किती खंबीर होते, याचा थोडासा अजमास तुह्मांस होईल. आपणांस इतर लोक काय ह्मणतील आणि आपली किती निंदा होईल, याबद्दल यत्किचिहि काळजी न बाळगतां आणि जनरूढीच्या बागुलबुवास भीक न घालतां ‘मनःपूतं समाचरेत्' असे वर्तन त्यांनी केले. स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीस जें योग्य वाटलें त्याचा त्यांनी निर्भय अंतःकरणाने उपदेश केला.
 वेदकालीन तत्त्ववेत्त्यांच्या विचारसरणीचे परीक्षण सुरू करण्यापूर्वी दुस-या एकदोन गोष्टींचा आपण प्रथम विचार करू. वेदांतील प्रत्येक देवता आरंभी सामान्य पदवीची अशी कल्पिलेली असून पुढे तिचा दर्जा वाढत जाऊन ती अनंत शक्तिमान् अशा परमेश्वराच्या दर्जास पोहोचविली असल्याचा उल्लेख अगोदर केलाच आहे. वेदांतील प्रत्येक देवतेस याप्रमाणें सामान्य पदवीपासून अत्युच्च दर्जापर्यंत तिच्या भजकांनी तिला पोहोंचविले असल्याचे आढळून येते. वेदकालीन देवतांसंबंधी ही एक विशेष गोष्ट असून तिजसंबंधी विचार करणे अवश्य आहे. इतर राष्ट्रांतील धर्माचा व दंतकथांचा विचार करतां त्यांची स्थिति याहून भिन्न आहे असे आढळून येते. बॅबिलोनियन दंतकथांचा विचार करतां त्यांतही आरंभीं अनेक देवतांची कल्पना आढळून येते; पण पुढे ही कल्पना संपुष्टांत येत येत अनेक देवतांपैकी एकच शिल्लक राहून तिला सर्वेश्वराची पदवी प्राप्त झाल्याचे दिसते. त्याचप्रमाणे ग्रीक देवतांचीही गोष्ट आहे. त्यांच्यापैकीही एकाच देवतेस अग्रेसरत्व प्राप्त होऊन ती सर्वेश्वराच्या सिंहासनावर आरूढ झाल्याचे व बाकी देवता नष्ट झाल्याचे आढळून येते. वेदकालीन देवतांची गोष्ट याहून भिन्न आहे. त्यांच्यापैकी एकही देवता नामशेष झाली नसून सर्वच परमशक्तिमानाच्या पदावर आरूढ झाल्या आहेत. वेदकालीन देवतांबद्दलचा हा विशेष मोक्षमुल्लर भट्टांच्या लक्ष्यांत आला होता; आणि पाश्चात्त्य एकेश्वरीमताहून हे मत भिन्न आहे अशा अभिप्रायाने त्यांनी या आर्यमतास Henotheism असे विशिष्ट नांव दिले आहे. पाश्चात्त्यांच्या आणि पौर्वात्यांच्या कल्पनांत असा फरक कशाने उत्पन्न झाला याचे कारण शोधण्यास फार लांब जावयास नको. ज्या स्थली या देवतांस सर्वेश्वरत्वाचे