पान:विवेकानंद.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]

श्रुतीतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

कोण जातो; अथवा एखाद्या गुहेत लपून कोण बसतो हे देवतांस समजते. दोन मनुष्ये अगदी एकांत-निर्मक्षिक-स्थली कांहीं बेत करीत असली तरी वरुण तेथे असतोच आणि त्यांचे सर्व बेतही तो ऐकतो. ही सर्व पृथ्वी त्याचीच आहे, आणि अनंत आकाशही त्याचेच आहे. दोन्ही समुद्र त्याच्या अंतरंगांतच आहेत. आकाशाच्याहि पलीकडच्या एखाद्या रहिवाशाने त्याच्या मर्यादेचे उल्लंघन करण्याचा यत्न केला, तथापि तेथेही तो वरुणदेवाच्या तडाक्यांतून सुटणार नाहीं. वरुणराजाचे दूत आकाशातून खाली उतरून सर्व जगभर फिरत असतात आणि त्यांच्या सर्वद्रष्टया हजारों नेत्रांस पृथ्वीच्या अत्यंत लांबच्या कोंपन्यांतील वस्तूही दिसतात.”
  याचप्रमाणे दुस-या देवतांचीही वाटतील तितकी उदाहरणे देता येतील. या सर्व देवतांच्या वर्णनाची एकच तन्हा आपणांस सर्वत्र आढळून येते. प्रथम मर्यादित अशा गुणांचा आरोप एखाद्या देवतेवर केला असून, नंतर तीच देवता अनंतस्वरूपाची असून तिच्यांत या सर्व विश्वाचा वास व ती सर्वसाक्षी आणि विश्वानियामक आहे असे तिचे वर्णन केले असल्याचे आढळते. वरुणाच्या वर्णनांत आणखीही एका कल्पनेचा उगम आढळून येतो; पण ही कल्पना उगमाबाहेर विस्तार पावली नाहीं तोंच तिचा उच्छेद झाला आहे हेही विशेषेकरून लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. ही कल्पना भीतीची होय. आपण पातकी असून आपल्या पातकाबद्दल क्षमा करावी अशा प्रकारची याचना वरुणापाशी केल्याचे एका मंत्रांत आढळून येते; पण पुढे असल्या कल्पनांचा अगदी क्षय झाला आहे. असल्या भीतीच्या कल्पना आर्यांनी आपल्या भूमीत कधींहि रुजू दिल्या नाहीत. त्यांविरुद्ध आर्यांचा इतका कटाक्ष कां होता याचा उलगडा आपणांस पुढे हळु हळु होईल. या कल्पनांचा उगम त्या काळी झाला होता; एवढेच सध्या लक्ष्यात ठेवलें ह्मणजे पुरे. पाप आणि भीति या कल्पना एकेश्वरी पंथवाल्यांच्या आहेत ही गोष्ट आपणा सर्वांस ठाऊकच आहे. या कल्पनांच्या वेदकालीन अस्तित्वाचरून एकेश्वरी मत वेदकाली उगम पावू पाहत होते असे दिसते. वेदांच्या पूर्वभागांत या एकेश्वरी कल्पनांचे अस्तित्व जिकडे तिकडे आढळून येते; पण या मताने आयचे समाधान झाले नाही व या कल्पनांचा त्याग करून ते पुढे सरसावले. या कल्पना केवळ बालबुद्धीसच शोभणाच्या आहेत अशी